पोलीस ठाण्यात येताना महिलांना भीती नव्हे तर सुरक्षित वाटेल, याप्रमाणे कार्यपद्धतीत बदल करा, अशा सूचना पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी बुधवारी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बुधवारी महिला सुरक्षाविषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पोळ बोलत होते. याप्रसंगी ‘लोकसत्ता’ चे निवासी संपादक मुकुंद संगोराम, इंडियन एक्सप्रेसच्या निवासी संपादक सुनंदा मेहता, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, महापौर वैशाली बनकर, आमदार नीलम गोऱ्हे, दीप्ती चौधरी, अपर पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके, चंद्रशेखर दैठणकर, सुरेश मेखला, काकडे समूहाच्या उपाध्यक्षा उषा काकडे, विविध सामाजिक संस्थांच्या महिला प्रतिनिधी, महिला नगरसेवक, सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
प्रत्येकाला स्वसंरक्षण करण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर धाक निर्माण करण्यासाठी तरुणींनी चाकू, मिरची पूड बाळगावी. अत्याचार करणाऱ्यांना स्वसंरक्षणार्थ चोप दिला तर तो गुन्हा ठरणार नाही, पोलीस तुमच्या पाठीशी राहतील. यापुढे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत
पुरुषांप्रमाणे महिला बीट मार्शल राहतील, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
पोलीस दलाच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणे अपेक्षित आहे. महिलांना पोलीस ठाण्यात येताना भीती वाटते. बलात्कार, विनयभंगासारख्या गुन्ह्य़ात माहिती देताना कुचंबणा होते.
महिला अधिकाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
संगोराम म्हणाले की, कोणत्याही पोलीस चौकीत जाताना प्रत्येकाला भीती वाटते, ही पोलीस दलाची ओळख बदलायला हवी.  पोलीस ठाण्यात पीडित महिला गुन्हा दाखल करण्यासाठी आल्यानंतर सर्व गुप्तता राखून त्या महिलेस मदत करणे फार महत्त्वाचे आहे. कमी गुन्हे नोंदविले गेले म्हणजे गुन्हेगारी कमी झाली अशी मानसिकता आहे. गुन्हे दाबून ठेवणे ही मानसिकता बदलायला हवी. त्याचबरोबर महिलांच्या संदर्भात घडणाऱ्या गुन्ह्य़ासंदर्भात पोलिसांकडे बोट दाखवून चालणार नाही. पुरुषांनी व महिलांनी आपल्या मानसिकतेत बदला करावा. विकृती असणारी माणसे फार कमी तर संस्कृती टिकवणारी माणसे जास्त असतात. ही विकृती नष्ट करण्यासाठी पोलिसांना मदत केली तर पुण्याचे सांस्कृतिक वैभव टिकून राहील.