शहरातील ज्योतीनगर भागात विश्वरूप हॉल या नावे अनधिकृत मंगल कार्यालय सुरू असून त्याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना होत असल्याची तक्रार महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांकडे वारंवार करण्यात आली. मात्र, कोणीच लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे.
या मंगल कार्यालयाचा मालक, ‘आपले राजकीय पदाधिकाऱ्यांशी संबंध आहेत. प्रशासनातील अधिकारी नातेवाईक आहेत. त्यामुळे कोणाकडेही तक्रार करा,’ अशी मुजोर भाषा वापरत असल्याचे या परिसरातील नागरिकांनी तक्रारीत नमूद केले आहे. अनधिकृत मंगल कार्यालयात मागील वर्षांत ९१ विवाह सोहळे झाले. अन्यही कार्यक्रम होत असतात. त्यामुळे परिसरात सतत ध्वनिप्रदूषण होते. डीजे, बँडबाजे, संगीतरजनीचे कार्यक्रम, मोठय़ा आवाजातले ध्वनिक्षेपक यामुळे नागरिक वैतागले आहेत. दुचाकी लावण्यासाठीची जागा अपुरी असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या अनुषंगाने १९ डिसेंबरला परिसरातील नागरिकांनी पोलीस आयुक्तांनाही पत्र लिहिले. भाजपच्या दिलीप देशमुख यांनीही महापालिका आयुक्तांकडे तक्रार दिली. विशेष म्हणजे विश्वरूप हॉलच्या उद्घाटनास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आवर्जून आमंत्रित केले होते. या भागातील अनधिकृत मंगल कार्यालयामुळे होणाऱ्या त्रासातून सुटका करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.