वसई-विरार महानगरपालिका विकास नियंत्रण प्रारूप नियमावलीला ऑगस्ट २०१२ मध्ये घेतलेल्या हरकतींची सुनावणी महानगरपालिका कार्यालयात झाली. उपसंचालक रेड्डी व जगताप यांच्यासमोर झालेल्या सुनावणीस जनता दलाचे प्रदेश महासचिव मनवेल तुस्कानो, वसई तालुका जनता दलाचे अध्यक्ष पीटर फर्नाडिस, निर्भय जनमंचचे सरचिटणीस पायस मच्याडो, यज्ञेश्वर पाटील, पी. पी. राऊत, रघु काळभाटे, पॅट्रिक फर्नाडिस आदींनी सुनावणीत भाग घेतला.
या सुनावणीत अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. मुंबई हायकोर्टात वसई-विरार मनपा क्षेत्रातून २९ गावे वगळण्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना २९ गावांसह विकास योजना तयार करणे चुकीचे आहे. वसई रोड, नालासोपारा व विरार या रेल्वेस्थानकांत प्रचंड गर्दी असते, ही सर्व स्थानके सर्व बाजूंनी इमारतींनी घेरल्यामुळे स्थानकांबाहेर छोटय़ा वाहनांसाठी जागा नाही. वाहनांची प्रचंड कोंडी व हवेचे, तसेच आवाजाचे प्रदूषण यामुळे लोकांना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव झालेला आहे. प्रवाशांना व नोकरदारांना रेल्वेने जा-ये करणे जिकिरीचे झाले आहे. आणखी रेल्वेमार्ग नव्याने सुरू होणे अडचणीचे आहे. अशा परिस्थितीत विशेष वसाहती आणि २२ माळ्यांचे टॉवर उभे करून वाढणाऱ्या लोकसंख्येला कसा आवर घालणार, असा सवाल या वेळी करण्यात आला.