वाहतुकीला अडथळा, प्रशासनाचे दुर्लक्ष
शहरात मोकाट जनावरांचा हैदोस वाढल्याने वाहतूक समस्या निर्माण झाली असून अनेक ठिकाणी अपघात झाले आहेत. महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस जनावरांचा बंदोबस्त करण्यास कमी पडल्याने नागपूरकरांची समस्या आखणीच बिकट झाली आहे. जनावरे पकडण्याची मोहीम राबविली जात असल्याचा दावा महापालिकेचे अधिकारी करीत असले तरी शहरातील रस्त्यांवर मात्र जनावरांचा सुळसुळाट दिसून येत आहे.
विविध वस्त्यांमध्ये असलेल्या जनावरांच्या गोठय़ांमुळे पसरणारी दुर्गंधी हीच सर्वाची डोकेदुखी ठरली आहे. ऐन वर्दळीच्या रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांमुळे अनेकदा अपघातसुद्धा झालेले आहेत. महापालिकेने याबाबत दंडाच्या रकमेत वाढ केली असली तरी त्याचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. मोकाट जनावरांमुळे होणारा वाहतुकीचा खोळंबा, ही बाब नागपूरकरांच्या डोकेदुखीत भर घालणारी ठरली आहे. अनधिकृत कोंडवाडय़ात ठेवण्यात येणारी जनावरे दिवसभर मोकाट फिरत असतात. ऐन चौकात  रस्त्याच्या मध्यभागी किंवा वर्दळीच्या ठिकाणी त्यांचा ठिय्या असतो. सकाळी वर्दळीच्या वेळी वाहतूक खोळंबल्याचे चित्र पाहायला मिळते. विशेषत: शहराच्या सीमावर्ती भागात मोकाट जनावरांचा त्रास अधिक आहे. त्याविषयी विशेष चर्चा होत नाही. सिव्हिल लाईन्स, बर्डी, हिंगणा टी-पॉईन्ट, वर्धा मार्गावरील विवेकानंदनगर चौक, छत्रपती चौक, सोमलवाडा, मानेवाडा चौक, अयोध्यानगर, बैद्यनाथ चौक, मोक्षधाम चौक, इमामवाडा, अशोक चौक, रेशीमबाग चौक, भांडे प्लॉट चौक, आयुर्वेदिक ले-आऊट, म्हाळगीनगर, नंदनवन, हुडकेश्वर मार्ग, मेडिकल चौक, तुकडोजी महाराज पुतळा, रामदासपेठ, धंतोली, आग्याराम देवी चौक, अजनी पोलीस ठाणे, नरेंद्रनगर रिंग रोड, फ्रेन्ड्स कॉलनी, सदर, रिंग रोडवर जनावरे उभी असतात. याबाबत योग्य ती कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस त्रास वाढत आहे. शहरात गेल्या पाच दिवसात चार अपघातही झाले. त्यात दोन युवक आणि एक शालेय विद्यार्थी जखमी झाला. महापालिका प्रशासन तात्पुरती कारवाई करते, नंतर पुन्हा स्थिती ‘जैसे थे’ होते. शहरात मोकाट जनावरांसाठी महापालिकेचे नऊ कोंडवाडे आहेत. यातील पारडी आणि कॉटन मार्केट परिसरातील कोंडवाडे बंद पडलेले आहेत. शहरात सुमारे ५० हजार गोपालक व्यावसायिक आहेत. सर्वाधिक मोकाट जनावरे कॉटन मार्केट परिसरात दिसून येतात, पण तेथील कोंडवाडा बंद आहे. मोकाट जनावरांना पकडण्याची कारवाई क्वचितच होत असली तरी, चारा खरेदी आणि त्यांच्या देखभालीवरचा खर्च कमी झालेला नाही. कोंडवाडय़ातील जनावरांसाठी दरवर्षी सुमारे चार ते पाच लाख रुपयांचा चारा खरेदी केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरांच्या मालकांविरुद्ध गुन्हे
मोकाट जनावरे पकडण्याची कारवाई सुरू असून बुधवारी तीन मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. पावसाळ्यात गाईच्या गोठय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी असल्यामुळे अनेक गोपालक त्यांना सकाळच्यावेळी मोकळे सोडून देत असल्याचे प्रकार बघायला मिळाले. मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांकडून आतापर्यंत पावणे दोन लाखाचा दंड वसूल केला आहे. महापालिकेने एप्रिल महिन्यात ८८, मेमध्ये ९२, जूनमध्ये १९२ व जुलैमध्ये आतापर्यंत २४४ जनावरे पकडली असल्याचा दावा महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद गणवीर केला आहे.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lots of animals on the road of nagpur disturb the transport
First published on: 26-07-2013 at 08:00 IST