सोनेरी शाही रथामध्ये ठेवलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिकलशाचे आज दुपारी सेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या समवेत कराड शहरात आगमन झाले. यावेळी शिवसैनिकांनी एकच गर्दी करून धीरगंभीर वातावरणात शिवसेनाप्रमुखांच्या अस्थिकलशाचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले.    
कराड शहराच्या प्रवेशद्वारावर कोल्हापूर नाका येथे सर्वप्रथम कराड तालुकाप्रमुख नितीन काशीद यांनी शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अस्थिकलशाचे दर्शन घेतले. पाठोपाठ कराड शहरप्रमुख हणमंत घाडगे, जिल्हा उपप्रमुख संजय मोहिते, सेनेचे पाटण तालुकाप्रमुख जयवंत शेलार, भाजपाचे कराड शहराध्यक्ष विष्णू पाटसकर, मलकापूर शहरप्रमुख तानाजी देशमुख,  माजी शहरप्रमुख प्रमोद तोडकर, दीपक सोळवंडे, सतीश तावरे, शिवप्रतिष्ठानचे रणजित पाटील, विकास पवार यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. यानंतर अस्थिकलश मिरवणुकीने मुख्य बाजारपेठेतून नेण्यात आला.
दरम्यान, कराडकर अबालवृध्दांनी दुतर्फा गर्दी केली होती. अस्थिकलशाच्या दर्शनासाठी लोकांची जणू झुंबडच उडली होती. सायंकाळी अस्थिकलश मिरवणूक पाटण येथे पोहचणार आहे. येथे अस्थिकलश दर्शन झाल्यानंतर त्याचे महाबळेश्वर येथे विधीवत विसर्जन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.