कुणी गुलाब पुष्प देऊन तर कुणी शुभेच्छापत्रे देऊन गुरुवारी प्रेमी युगुलांना व्हॅलेंटाईन दिन उत्साहात साजरा केला. अनेक हॉटेल्समध्ये तरुण-तरुणींची गर्दी होती. व्हॅलेंटाईन दिनी विरोधासाठी विनापरवानगी मिरवणूक काढणाऱ्यांना सोनेगाव व सीताबर्डी पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतले.
शहरातील अंबाझरी, सेमिनरी हिल्स, बॉटनिकल गार्डन, गोरेवाडा, तेलंखेडी ही प्रेमी युगुलांची आवडती ठिकाणे. मात्र, आज दिवसभर या परिसरात शांतता जाणवली. गणवेषातील तसेच साध्या वेषातील पोलीस फिरत होते. दरवर्षी व्हॅलेंटाईन दिनास विरोध करणाऱ्यांकडून प्रेमी युगुलांना होणारी मारहाण पाहता अनेक जोडपी या परिसरात फिरकलीच नाहीत. काही तरुण-तरुणी दिवसभरात येत होती. पोलीस दिसल्याने घाबरत होती. कुणी बोलत असतील तर आक्षेप नाही, चाळे करताना दिसल्यासच कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी आधीच जाहीर केले होते. त्यामुळे अनेक तरुण-तरुण सभ्यतेने वावरताना
दिसले.
बॉटनिकल गार्डन व अंबाझरी उद्यानात पोलीस जवळ नाहीत हे पाहून झाडांच्या आड जाऊन उत्साही प्रेमवीरांनी गाजवलेले ‘शौर्य’ही लपून राहिले नाही. अनेकांनी आज शहराबाहेर धाव घेतली. ग्रामीण भागात दुचाकींवर तरुण-तरुणींची गर्दी दिसून आली. विविध महाविद्यालयांमध्ये आज वेगळाच आनंद दिसून येत
 होता.
पोलिसांचा बंदोबस्त आणि विरोध यामुळे अनेकजणांनी घरातच राहणे पसंत केले. तरुण-तरुणींजवळील मोबाईल नेटवर्क आज नेहमीपेक्षा जास्त ‘बिझी’ होते. अनेकांच्या मोबाईलवरील मॅसेज टोन्स सारख्या वाजत होत्या आणि आलेले मॅसेज वाचण्यात तरुणाई दंग होती. फेसबुक व ई-मेल नेटवर्कही बिझी होते.
गुलाब पुष्पे, शुभेच्छापत्रे तसेच विविध भेट वस्तू घेण्यासाठी धरमपेठ, सीताबर्डी, लॉ कॉलेज चौक, सदर, महाल, वर्धमाननगर परिसरातील विविध दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. गुलाब पुष्पाला प्रचंड मागणी असल्याने सायंकाळी अनेक ठिकाणी गुलाब मिळू शकला नाही. रात्री अनेक हॉटेल्स, आईसक्रीम पार्लर्स तसेच रेस्टॉरंटमध्ये गर्दी दिसून आली. फुटाळा तलावावर सायंकाळनंतर तरुण-तरुणींची गर्दी झाली असली तरी पोलिसांच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या चेहऱ्यावर दडपण दिसून येत होते.