लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर आरूढ होत मतदान केंद्राबाहेर लांबच्या लांब रांगा लावणाऱ्या मतदारांचा उत्साह विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या मतदानादरम्यान काहीसा कमी झाल्याचे चित्र दिसून आले. ठाणे, कल्याण, डोंबिवली यासारख्या परिसरातील काही मतदारसंघांमधील मतदानाची टक्केवारी दुपापर्यंत फारशी उत्साहवर्धक नव्हती. मुंब्र्यातील मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत गर्दी कमीच जाणवत होती. ठाण्यातील काही मतदान केंद्रांत तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांची संख्या मात्र लक्षणीय दिसून येत होती. कळवा-मुंब्र्यातील संवेदनशील मतदारसंघांत दुपापर्यंत शांततेत मतदान सुरू होते. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात ढोकाळी भागात महापालिकेच्या शाळेत चक्क तिसऱ्या मजल्यावर केंद्र ठेवण्यात आले होते. त्यामुळे केंद्रापर्यंत पोहचणे ज्येष्ठ नागरिकांना कठीण जात होते.   
ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्या घटल्याचे चित्र पाहावयास मिळाले. विशेष म्हणजे, मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य महिला व पुरुष मतदार मतदानाचा हक्क बजावताना दिसून आले. या तुलनेत तरुण मतदार फारच कमी प्रमाणात दिसून येत होते. लोकसभा निवडणुकीच्या मतदाना वेळी ठाणे, कल्याणातील गुजराती, मारवाडी मतदार मोठय़ा संख्येने मतदानासाठी उतरला होता. काही व्यापाऱ्यांनी तर आपली दुकानेही बंद ठेवली होती. यंदा मात्र गुजराती मतदार त्या प्रमाणात मतदान केंद्रावर दिसून येत नव्हता. ठाणे जिल्ह्य़ातील जवळपास प्रत्येक मतदारसंघात दुपापर्यंत मतदानाची टक्केवारी २० ते २२ टक्क्य़ांच्या घरात होती. सायंकाळी सहापर्यंत मतदानाची वेळ असल्याने टक्केवारी वाढेल, असा विश्वास राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व्यक्त करत होते.
ठाणे जिल्ह्य़ातील अंबरनाथ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत १० टक्के तर उर्वरित १७ मतदारसंघांत पाच ते सात टक्के मतदानाची नोंद झाली होती. दुपारी १ वाजेपर्यंत या टक्केवारीत १५ ते १८ टक्क्य़ांनी वाढ झाली. विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचाराचा झंझावातउभा केला होता. या झंझावाताचा मतदानावर किती प्रभाव पडतो याकडे सर्वाचे लक्ष लागून होते. मात्र, मतदानाच्या सकाळच्या टप्प्यात मतदानात फारसा उत्साह नव्हता. ठाणे शहर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे ऊमेदवार संजय केळकर यांची मदार नौपाडा, विष्णुनगर परिसरातील वस्त्यांमधील मतदारांवर असल्याने या ठिकाणी मतदार मोठय़ा संख्येने बाहेर काढण्यासाठी भाजप आणि संघाचे कार्यकर्ते सकाळपासूनच कामाला लागले होते. ओवळा-माजीवडा मतदारसंघात मतदारांना केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांकडून बस, रिक्षांचा वापर केला जात होता. ठाणे जिल्ह्य़ातील भिवंडी पूर्व मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सर्वाधिक २५.४६ टक्के इतके मतदान झाले होते. या ठिकाणी शिवसेनेचे आमदार रुपेश म्हात्रे यांना तीन प्रमुख मुस्लीम उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. मुरबाड मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद होती.  कोपरी-पाचपाखाडी, ठाणे शहर, ओवळा-माजिवाडा आणि मुंब्रा-कळवा या चारही विधानसभा मतदारसंघांत सकाळपासूनच शांततेत मतदान सुरू होते. येथील मतदान केंद्रावर मतदारांची फारशी गर्दी दिसत नव्हती. रणरणत्या उन्हामुळे दुपारी मतदानाची आकडेवारी काहीशी कमी झाल्याचे दिसून आले. तसेच कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lowest voter turnout in thane
First published on: 16-10-2014 at 02:14 IST