डाकले महाविद्यालयाने पुणे विद्यापीठाकडे शिष्यवृत्तीचे अर्ज तब्बल सहा महिने उशिरा पाठवल्याने एम.कॉम.च्या वर्गात शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांना मुकावे लागणार आहे. महाविद्यालयाने ही चूक दुसऱ्यांदा केली आहे.
एम. कॉम. प्रथम वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बी. कॉम. परीक्षेत ६० टक्के गुण असेल व उत्पन्न १ लाखाच्या आत असेल तर एकलव्य आर्थिक साहाय्य योजनेंतर्गत पुणे विद्यापीठ ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देते. या शिष्यवृत्तीसाठी सागर निरगुडे, नीलेश पवार, पंकज कसार, दिनेश बेंद्रे या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे दि. १३ सप्टेंबर २०१२ रोजी अर्ज केले. महाविद्यालयाने हे अर्ज ३० सप्टेंबर २०१२ पूर्वी पुणे विद्यापीठाकडे पाठवणे गरजेचे होते. पण डाकले महाविद्यालयाने तब्बल ६ महिने उशिरा अर्ज विद्यापीठाकडे पाठवले. त्यामुळे आता विद्यापीठाने शिष्यवृत्ती देण्यास नकार दिला आहे. बदलून गेलेले प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांनी विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. त्यांना विद्यापीठाने शिष्यवृत्ती दिली नाही तर महाविद्यालय पैसे देईल, असे कबूल केले होते. पण आता प्राचार्य एल. डी. भोर यांनी मात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम देण्यास हात वर केले आहे. एवढेच नव्हेतर तक्रार केल्यास नुकसान होईल, असे बजावले आहे.