वसई-विरार महापालिकेने पुरस्कृत केलेल्या ५८ व्या राष्ट्रीय शालेय बुध्दिबळ स्पर्धेत महाराष्ट्राने १९ वर्षांखालील मुलांच्या गटात कांस्यपदक मिळविले. या संघात कोल्हापूरच्या विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या अनिश गांधीचा समावेश होता. विरार येथील न्यू विवा ठाकूर कॉलेज मध्ये झालेल्या या स्पर्धेत १४, १७ व १९वर्षांखालील मुले व मुली अशा ६ गटात स्पर्धा घेण्यात येऊन सर्व गटात मिळून २१ राज्यांतून जवळजवळ ६०० बुध्दिबळपटू सहभागी झाले होते. प्रत्येक गटात स्विस लिग पध्दतीने सहा फेऱ्या घेण्यात आल्या. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राने चंदिगडचा पहिला फेरीत ४ विरूध्द ० ने सहज पराभव केला. दुसऱ्या फेरीत दिल्लीचा साडेतीन विरूद्ध अध्र्या गुणाने पराभव करतांना महाराष्ट्रास फारसे प्रयास पडले नाहीत. तिसऱ्या फेरीत अग्रमानांकित आंध्रप्रदेशकडून साडेतीन विरूध्द अध्र्या गुणाने महाराष्ट्र पराभूत झाला. नंतर चौथ्या फेरीत कर्नाटक विरूध्द बरोबरी साधत महाराष्ट्राने पाचव्या फेरीत गोव्यावर चार विरूध्द शून्य ने एकतर्फी विजय मिळविला.
अंतिम सहाव्या फेरीत केंद्रीय विद्यालय संघटनेचा साडेतीन विरूध्द अध्र्या गुणाने पराभव करून महाराष्ट्राने ९ पॉईंटसह कांस्यपदक मिळविले. ११ पॉईंट मिळविणाऱ्या तामिळनाडूस सुवर्णपदक, तर १० पॉईंट मिळविणाऱ्याआंध्रप्रदेशला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.महाराष्ट्राच्या संघामध्ये कोल्हापूरच्या अनिश गांधीसह शंतनू मिराशी (पुणे), शिवा पिल्लाई (मुंबई),चिन्मय पाठक (नागपूर) व हर्ष गादिया (औरंगाबाद) यांचा समावेश होता. मुलींमध्ये १४, १७, व १९ वर्षांखालील तिंन्ही गटामध्ये महाराष्ट्राने सुवर्णपदक मिळवून नेत्रदीपक कामगिरी केली. तीन सुवर्ण व एक कांस्य पदकासह महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. एक सुवर्ण व तीन रौप्य पदकासह तामिळनाडूने उपविजेतेपद मिळविले. तर आंध्रप्रदेशला एक सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य पदकासह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.या स्पर्धेचे उद्घाटन ग्रॅन्डमास्टर अभिजित कुंटे यांच्या हस्ते झाले. या वेळी हितेंद्र ठाकूर, रविंद्र डोंगरे,विभागीय क्रीडा संचालक एन.बी.मोटे आदी उपस्थित होते.