घाऊक बाजारपेठेत भाज्यांचे दर स्थिरावत असले तरी किरकोळ विक्रेत्यांकडून सुरू असलेली ग्राहकांची लूट थांबावी यासाठी राज्य सरकारने शोधलेला स्वस्त भाजी विक्री केंद्रांचा पर्याय या महागाईवर उतारा ठरू शकेल काय, असा सवाल या क्षेत्रातील जाणकारांमधून उपस्थित होऊ लागला आहे. मुंबई तसेच आसपासच्या उपनगरांमधील महापालिकेच्या मोठय़ा भाजी मंडयांचे नियंत्रण बाजार समितीकडे सोपविले जावे तसेच किरकोळ बाजारही काही प्रमाणात नियमनाखाली आणावा, अशा स्वरूपाची चर्चा युती सरकारच्या काळापासून सुरू आहे. एपीएमसीच्या नियंत्रणाखाली असलेल्या घाऊक बाजारातील भाज्यांच्या दरात पुरेशी स्पष्टता असते. किरकोळ बाजारावर मात्र कुणाचेही नियंत्रण नसल्याने तेथील भाज्यांचे दर वस्ती बदलते तसे बदलत जातात. या दरांवर नियंत्रण कुणी आणि कसे ठेवायचे, याचे कोडे अजूनही सरकारला उलगडलेले नाही. त्यामुळे भाज्यांची दरवाढ सुरू होताच स्वस्त भाजी विक्री केंद्र सुरू करून भाववाढ तात्पुरती आटोक्यात येणे शक्य असले तरी मूळ दुखणे संपणार आहे का, हा प्रश्न अद्याप कायमच आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे तसेच नाशिक जिल्हायातून मुंबईकडे येणारा भाजीपाला कमी झाल्यामुळे जवळपास सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. टॉमेटो, मिरची, आलं, कांदा, भेंडी अशा काही भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर वाढताच किरकोळ विक्रेत्यांनी नेहमीपेक्षा चार पटीने भाववाढ केल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले. घाऊक बाजारात ३०-३५ रुपयांनी विकला जाणारा टॉमेटो किरकोळ विक्रेत्यांनी थेट ८० रुपयांपर्यंत नेऊन ठेवला आणि महागाईच्या नावाने ओरड सुरू झाली. यामुळे खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने उशिरा का होईना, स्वस्त भाजी विक्री केंद्राची योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली अशा मुंबई महानगर प्रदेशात पहिल्या टप्प्यात १० ते १२ भाजी विक्री केंद्रे सुरू केली जाणार आहेत. एवढय़ा मोठय़ा विस्तीर्ण परिसरात पहिल्या टप्प्यात १०-१२ आणि टप्प्याटप्प्याने १०७ भाजी विक्री केंद्रे सुरू करून किरकोळ बाजारात ग्राहकांची सर्रासपणे होणारी लूट थांबणार आहे का, असा सवाल आता ग्राहकांकडून विचारला जात आहे.
ठाणे, नवी मुंबई, कल्याणमध्ये तुरळक केंद्रे
सरकारने निश्चित केलेल्या १२ केंद्रांच्या यादीत अपना बाजार, सहकार बाजार काही दूध विक्री केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. ठाणे, कळवा परिसरात अवघे एक केंद्र सुरू करण्यात येणार असून नवी मुंबईत हे केंद्र सुरू करण्यासाठी एपीएमसी अद्याप जागेच्या शोधात आहे. कल्याण परिसरात अपना भांडारमध्ये स्वस्त भाजी विक्री केंद्र सुरू करण्याचे निश्चित केले असले तरी डोंबिवलीत या केंद्रासाठी जागा सापडत नसल्यामुळे पणनमंत्र्यांनी स्थापन केलेली सुकाणू समिती तेथेही जागेचा शोध घेत आहे. अंबरनाथ, बदलापूर, वसई-विरार, मीरा-भाइंदर या नागरी पट्टय़ात सहकारी केंद्रांमध्ये भाज्यांचा पुरवठा कसा करायचा या विषयी फारशी स्पष्टता नाही. पुणे, नाशिक जिल्ह्यातील शेतक ऱ्यांना मुंबईतील बाजारात थेट भाजी आणण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांनी माल आणायचा कोठे आणि सोडायचा कसा, याविषयी पुरेशी स्पष्टता नाही, असे काही शेतकरी प्रतिनिधींनी सांगितले. मुंबई तसेच आसपासच्या सहकारी केंद्रांना भाजीचा पुरवठा करण्यासाठी एपीएमसीमधील घाऊक व्यापारी संघटनेची मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे शेतक ऱ्यांनी थेट मुंबईत भाजी घेऊन जाण्याची घोषणा मुळात फसवी असल्याची टीका आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
महागाईचा हंगाम दरवर्षीचा
पाऊस सुरू होताच जून, जुलै महिन्याच्या सुरुवातीस दरवर्षी भाज्यांचे दर वाढतात, असा अनुभव आहे. या वर्षीही घाऊक बाजारात दर वाढले खरे, मात्र ते अजूनही हाताबाहेर गेलेले नाहीत. घाऊक बाजारात टॉमेटो (३४), आलं (९५), वांगी (२०), गवार (४०) अशा भाज्यांचे दर गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत कमी होऊ लागले आहेत. काल-परवापर्यंत ३८ रुपयांनी विकल्या जाणाऱ्या भेंडीचे घाऊक दर या आठवडय़ात २६ रुपयांपर्यंत खाली उतरले आहेत. असे असले तरी किरकोळ विक्रेत्यांनी मात्र चढय़ा दरानेच भाज्यांची विक्री सुरू ठेवली आहे. सहा महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढविताना किरकोळ बाजारात वेगवेगळी कारणे पुढे केली जात आहेत. पेट्रोल, डिझेल दरवाढीचा बागुलबुवा उभा करत असताना काही विक्रेते तर एलबीटीमुळे भाज्या महागल्या, अशी आवई उठवत असल्याचे चित्र आहे. दुष्काळामुळे भाजी महाग झाल्याचे कारण सर्रासपणे पुढे केले जात आहे. आता पावसामुळे भाजी खराब येत असल्याचे कारण पुढे करून किरकोळीची भाजी महाग केली जात आहे. सतत महागाईच्या हिंदूळ्यावर डोलणाऱ्या किरकोळ बाजारावर कसे नियंत्रण मिळवायचे, याचे कोडे सरकारला काही केल्या सुटत नाही. त्यामुळे स्वस्त भाजी विक्री केंद्राच्या तात्पुरत्या मलमपट्टीने ग्राहकांच्या पाचवीला पुजलेली महागाई आटोक्यात येईल का, हा सवाल कायमच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government taking necessary step to control vegetable rate in retail market
First published on: 06-07-2013 at 12:10 IST