साहित्य-सांस्कृतिक
महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात करून संत नामदेव यांनी समतेची पताका संपूर्ण देशभरात नेली. पण नामदेवांच्या कर्तृत्वाकडे महाराष्ट्राचे दुर्लक्ष झाले, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले.
पत्रकार सचिन परब व श्रीरंग गायकवाड यांनी संपादित केलेल्या ‘महानामा’या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कोतापल्ले आणि माजी संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. मनोविकास प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
या पुस्तकाच्या निमित्ताने नामदेव यांच्या कार्याला पुन्हा उजाळा मिळेल, असा विश्वासही डॉ. कोतापल्ले यांनी व्यक्त केला. संत नामदेव यांच्या कर्तृत्वाचा विविध अंगाने आढावा घेणारे लेख, प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केलेले वृत्तांकन या पुस्तकात आहे.
‘वजनातील चढउतार- एक सापशिडीचा खेळ’
लठ्ठपणा आणि त्यावरील उपाय यावर संशोधन करून डॉ. विनोद आणि निखिल धुरंधर यांनी लिहिलेल्या ‘वजनातील चढउतार- एक सापशिडीचा खेळ’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. वि. ना. श्रीखंडे यांच्या हस्ते नुकतेच एका कार्यक्रमात झाले. पॉप्युलर प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. अभिनेत्री स्मिता जयकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.  
राष्ट्रवादीच्या ग्रंथालय पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन
राष्ट्रवादी ग्रंथालय सभेचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन येत्या २० जानेवारी रोजी परळ येथील नरे पार्क मैदान येथे आयोजित करण्यात आले असून अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. अधिवेशनासाठी महाराष्ट्रासह अन्य १५ राज्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळ, केंद्र शासनाने अद्याप लागू न केलेला सार्वजनिक ग्रंथालय कायदा, ग्रंथालय चळवळीचे भविष्य आदी विविध विषयांवर ऊहापोह केला जाणार आहे.
१५० पुस्तकांचा खजिना!
स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने ‘व्यास क्रिएशन’तर्फे बाल वाचकांसाठी १५० पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने १५० शाळा, १५० तालुके आणि १५० व्याख्याने यांचा गोफ विणण्यात येणार आहे.   स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि व्यक्तिमत्त्व पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे ‘व्यास क्रिएशन’चे नीलेश गायकवाड यांनी सांगितले.  अधिक माहितीसाठी ०२२-२५४४७०३८ या क्रमांकावर संपर्क साधावा.