डॉ. दीपक पवार लिखित ‘महिलांचे राजकीय सक्षमीकरण’ आणि डॉ. राहूल भगत लिखित ‘स्थलांतरित बंगलादेशीय’ या दोन ग्रंथांचा प्रकाशन समारंभ नुकताच पार पडला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागात पार पडलेल्या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्राचे प्राध्यापक व मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. जगन कराडे, प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, पत्रकार भूपेंद्र गणवीर प्रामुख्याने उपस्थित होते. आंबेडकर विचारधारा विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे अध्यक्षस्थानी होते. आधुनिक काळात स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय सक्षमीकरणाच्या संदर्भात सर्वप्रथम सामाजिक क्रांतीचे अग्रदूत ज्योतिराव फुले यांनी अतिशय समर्थपणे विचार मांडला होता. इतक्या वर्षांनंतर अलिकडे केंद्र सरकारने १९९३ च्या ७३ आणि ७४ च्या घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राजमध्ये स्त्रियांना राजकीय आरक्षण दिले आहे, असे मत डॉ. जगन कराडे यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ. बाबनराव तायवाडे म्हणाले, अनेक प्राध्यापक पीएचडीचे संशोधन करतात. परंतु ते ग्रंथरुपाने प्रकाशित होत नाही. डॉ. पवार आणि डॉ. भगत यांच्या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अनुदान प्राप्त झाल्याचेही ते म्हणाले. या दोन्ही ग्रंथाचे सामाजिक व आणि पत्रकारितेच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. या दोन्ही ग्रंथाचे विषय अतिशय संवेदनशील असून त्याचा संबंध राजकारणाशी असल्याचे भूपेंद्र गणवीर यावेळी म्हणाले.
डॉ. प्रदीप आगलावे यांनी भाषणात दोन्ही ग्रंथाचे संशोधन मूल्य विशद केले. दोन्ही ग्रंथाच्या लेखकांनी ग्रंथांच्या संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले.
संचालन डॉ. राजेंद्र कांबळे              यांनी केले तर साईनाथ प्रकाशनाच्या संचालिका ललिता पुराणिक यांनी आभार मानले. कार्यक्रमास  शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahilanche rajkiy sakshamikaran and stalantarit bangladeshi published
First published on: 06-02-2014 at 12:18 IST