ठाणे शहरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेने या कुत्र्यांना आवर घालायचा असेल तर येथील रहिवाशांनी स्वच्छतेचा ध्यास धरावा, असे आवाहन केले आहे. महापालिकेने गेल्या काही वर्षांत ४२ हजार कुत्र्यांच्या मुसक्या आवळल्या असून तितक्याच कुत्र्यांचे निर्बीजीकरणही केले आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर मोहीम राबवूनही अजून ८०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण झालेले नाही. त्यामुळे या कुत्र्यांमधील प्रजनन क्षमता अद्याप कायम असून अशा कुत्र्यांचा शोध आता महापालिका घेत आहे. ठाण्यात विशेषत: मुंब्रा परिसरात कचराकुंडय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मांसाहार सापडत असल्याने हा सगळा परिसर कुत्र्यांसाठी मेजवानीचे ठाणे ठरू लागला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना कितीही आवर घातला तरी जोपर्यंत स्वच्छता राखली जात नाही, तोवर हा उपद्रव सुरूच राहणार, अशी स्पष्ट कबुली महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ला चढविल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून निर्बीजीकरणाची शस्त्रक्रियाही बोगस ठरल्याचा आरोप नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत करण्यात आला होता. याशिवाय श्वानदंशावरील लस महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे ठाणेकरांच्या त्रासात भर पडत आहे. कळवा, मुंब्रा यांसारख्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असताना महापालिकेकडून ठोस असा कार्यक्रम राबविला जात नसल्याचा आरोपही नगरसेवक करू  लागले आहेत. या सर्वाची दखल आयुक्त असीम गुप्ता यांनी घेतली असून कुत्र्यांना पकडण्यासाठी आणखी एक नवे वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मुंब्रा.. कुत्र्यांचे ठाणे
 कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी निर्बीजीकरण झाले नसलेल्या ‘त्या’ ८०० कुत्र्यांचा शोध महापालिका घेत आहे. ठाणे शहरात सुमारे ४२ हजार भटके कुत्रे असून त्यापैकी ९० टक्के कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, अशी माहिती गुप्ता यांनी दिली. अजूनही निर्बीजीकरण झाले नसलेल्या कुत्र्यांची संख्या मोठी असून ही महापालिकेपुढील चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. मुंब्रा परिसरात कचराकुंडय़ांची सफाई वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी आहे. जेथे कचरा साचतो तेथे कुत्रे येणारच, कारण तेथे कुत्र्यांना उंदीर तसेच इतर खाद्यपदार्थ मिळत असतात. मुंब्रा परिसरात कचराकुंडय़ांमध्ये मांसाहार मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होत असल्याने तेथे कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी स्वच्छता आणि नियमित साफसफाई हा एकमेव उपाय असल्याचे गुप्ता यांनी मान्य केले. आम्ही निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रिया कितीही केल्या तरी कचराकुंडय़ांमध्ये कचरा साचत असेल तर अन्नाच्या शोधात इतर भागांतील कुत्रेही तेथे येणारच. त्यामुळे व्यक्तिगत स्वच्छता आणि कचराकुंडय़ांची सफाई यावर यापुढे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मुंब्य्रात यासंबंधीची मोहीम राबवावी लागेल, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maintain cleanliness prevents dogs
First published on: 12-07-2014 at 03:45 IST