भुईज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे सन २०११-१२ व सन २०१२-१३ या आर्थिक वर्षांतील लेखापरीक्षणाचे सहकार खात्यामार्फत फेर लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी आमदार मकरंद पाटील यांनी केली आहे.
आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली. या संदर्भात साखर आयुक्तांकडून अधिक माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही सहकार मंत्र्यांनी आ. पाटील यांना दिली. या वेळी कारखान्याचे गैरव्यवस्थापना संदर्भात वास्तव चित्र नितीन पाटील यांनी सहकार मंत्र्यापुढे मांडले.
या अहवालातील ताळेबंद आणि नफा तोटा पत्रकामध्ये अवास्तव बाबी व खोटी आíथक पत्रके प्रसिद्ध करून सभासदांची दिशाभूल करण्यात आल्याचे दिसून येत आहे. सन २०११-१२ मध्ये नफा तोटा पत्रकात साखर चढउतार निधीची ६ कोटी २३ लाख रुपयांची रक्कम इतर उत्पन्नात समाविष्ट केली आहे. स्क्रॅपचे मूल्यांकन १ कोटी ८९ लाखाने वाढवून इतर उत्पन्नात दाखविले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तोटा असताना १४ लाख रुपयांचा नफा झाल्याचे दिसून येते. सभासदांच्या ठेवीवरील व्याजाची रक्कम १ कोटी ४० लाख व्याज खर्चात दाखविले नाही. तसेच अनुत्पादक निधीवरील घसारा २ कोटी २८ लाख रुपये दाखविण्यात आला. त्याचा अहवालातील परिशिष्टांशी ताळमेळ लागत नाही.
सन २०१२-१३ मध्ये कारखान्याने १६ कोटी ४० लाख रुपयांनी घसारा कमी दाखविला असून त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. २२ मेगाव्ॉट को जनरेशन प्रकल्पासाठी वापरण्यात आलेल्या बगॅसचे मूल्यांकन न करता त्याचा वापर शून्य दाखवून ५ कोटी ५० लाख रुपये नफ्यात दाखविण्यात आले आहेत. या बाबी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत. सन ११-१२ मध्ये उसाला प्रतिटन २२५० रुपये अंतिम दर जाहीर केला.  यातील २१०० रुपयांप्रमाणे पैसे दिले,. मात्र १५० रुपयांप्रमाणे १० कोटी २० लाख थकीत आहेत. ऊस उत्पादक सभासद आणि बिगर सभासदांच्या सुमारे २१ कोटी रुपयांच्या ठेवी व त्यावरील व्याज  दहा वर्षांत दिलेले नाही. व्याजासह ही रक्कम ४८ लाखांपेक्षा जास्त आहे. या ठेवींची मुदत संपल्याने ठेवी आणि त्यावरील व्याज दहा वर्षांत दिलेले नाही.
कारखान्याचे कर्ज ३४९ कोटी रुपयांचे असून इतर देणी दीडशे कोटींच्या आसपास आहेत. ही कर्जे व देणी मिळून अंदाजे साडेपाचशे कोटींचा आर्थिक बोजा कारखान्यावर आहे. याचा थेट संवाद कारखान्याच्या सभासदांशी येतो. याशिवाय प्रतापगड कारखान्याच्या सर्व कर्जाची आणि खंडाळा कारखाना उभारण्याची जबाबदारी पुन्हा किसन वीरने घेतली आहे. यापासून किसन वीरच्या सभासदाला रुपयाचाही फायदा नाही, उलट कर्जाचा भार सभासदांवर पडणार आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस या ठिकाणी गाळला जाणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात हा कारखाना दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आहे. आधीच जिल्ह्य़ातील काही कारखाने अडचणीत आले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून सत्ता कोणाचीही असली तरी कारखाना टिकविण्याच्या दृष्टिकोनातून या कामी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज असल्याचे आ. पाटील यांनी या वेळी सहकार मंत्र्यांना सांगितले.
या वेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापराव पवार, वाई सूत गिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ, बाळासाहेब भिलारे, दत्तानाना ढमाळ, अ‍ॅड. श्यामराव गाढवे, आनंदराव शेळके-पाटील, राजेंद्र राजपुरे, शशिकांत पवार, सत्यजीत वीर, मोहन जाधव, प्रमोद शिंदे, शेखर कासुर्डे, प्रवीण भिलारे, रमेश गायकवाड, दत्तात्रय ऊर्फ बुवा खरात, नारायण जाधव, मदन अप्पा भोसले, मनीष भंडारे आदी उपस्थित होते.
निवडणुकांमुळे विरोधकांचे आरोप- बाबर
 किसन वीर कारखान्याचा कारभार सुरळीत चालू असून केवळ दोन महिन्यात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांनी सभासदांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने चुकीचे निवेदन दिले आहे, असे कारखान्याचे उपाध्यक्ष खासदार गजानन बाबर यांनी म्हटले आहे.
ज्यांनी निवेदन दिले त्यांच्या वडिलांकडे १० वर्षांपूर्वी असणारा कार्यकाल सभासदांनी तपासून पाहावा. त्यांच्या कारकिर्दीत विस्तारीकरण आणि विविध कारणांसाठी १२८.०१ कोटी रुपयांचे दायित्व त्यावेळी होते, ते आम्ही स्वीकारले आहेत.
मागील दहा वर्षांतील आर्थिक व विविध प्रकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीने उभारले. २०११-१२ मध्ये २२ को-जन प्रकल्प उभारणी, मूळ मशिनचे आधुनिकीकरण, गाळप क्षमता ५००० करण्यात आली. या अनुषंगाने निघालेले स्क्रॅप मालाचे मूल्यांकन त्या सालात दाखवले. सभासदाच्या ठेवी व त्यावरील व्याजाला सभासदांनीच मुदत वाढ दिली आहे. कारखान्याची दीर्घकालीन कर्जे ८३२०.६४ लाख असून आजमितीस त्याची बाकी ७३८८.५१ लाख आहे. त्यांनी सांगितलेले ५२५ कोटी कर्जाचा उल्लेख मोघम खोडसाळ व सभासदांची दिशाभूल करणारा आहे. कारखान्याची साखर तारण कर्जे सोडल्यास एकूण कर्जे १४२.८१ कोटी रुपयांची आहेत. आमच्या व्यवस्थापनाने कोणतीही कपात न करता उसाचा जास्तीत जास्त दर दिलेला असल्याचेही खा. बाबर यांनी सांगितले.