रात्री १० ते सकाळी सहा या वेळेत वीज दर सवलत प्रति युनिट एक रुपया ऐवजी २.५ रूपये करण्यास महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मान्यता दिल्याने उद्योजकांनी योग्य नियोजन करून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. शाम पाटील आणि सचिव वर्धमान सिंघवी यांनी केले आहे.
महावितरण कंपनीने दर याचिकेव्दारे यासंदर्भात मागणी केली होती. तथापि १६ ऑगस्ट २०१२ च्या दर आदेशात आयोगाने फक्त एक रुपये दर सवलत निश्चित केली होती. त्यामुळे महावितरणने आयोगासमोर फेरविचार याचिका दाखल केली. राज्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या समन्वय समितीनेही हीच मागणी राज्य शासन, महावितरण व आयोगाकडे केली होती.
महावितरणकडे रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध असूनही मागणी नसल्याने दररोज ३०० ते ७०० मेगाव्ॉट पर्यंत रात्रीचे उत्पादन कमी करावे लागत होते. उद्योगांचा रात्रीचा वीज वापर वाढल्यास सर्व उपलब्ध वीज वापरणे शक्य आहे. या सर्व बाबी ध्यानी घेवून आयोगाने या दर सवलतीस प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी मान्यता दिली आहे.
तथापि, रात्रीचा वीज वापर वाढल्यास व योग्य भार व्यवस्थापन झाल्यास ही दर सवलत कायमची उपलब्ध होणार हे निश्चित, असेही प्रा. पाटील आणि सिंघवी यांनी सांगितले.
सध्या राज्यातील दोन सत्रांमध्ये १६ तास उद्योग चालविणारे बहुतांशी उद्योजक सकाळी आठ ते दुपारी चार, दुपारी चार ते रात्री १२ या सत्रात काम करतात. काही उद्योगामध्ये ही वेळ सकाळी सहा ते दुपारी दोन आणि दुपारी दोन ते रात्री १० अशीही आहे. या उद्योजकांनी रात्री १० ते सकाळी सहा या वेळेत पूर्ण वीज वापर होईल, अशा पद्धतीने दोन सत्रांचे नियोजन केल्यास त्यांना चांगला लाभ होऊ शकेल. तसेच २७ अश्वशक्तिच्या आतील लघू उद्योजकांनाही त्यांच्याकडे टीओडी मीटर असल्यास ही दर सवलत उपलब्ध आहे. ज्याच्याकडे टीओडी मीटर नाही, त्यांनी महावितरण कंपनीकडे त्यासाठी लेखी मागणी करावी. मीटर विनामूल्य व त्वरित बसवून देणे महावितरणवर बंधनकारक आहे.
 हे सर्व ध्यानी घेऊन उद्योजकांनी योग्य नियोजन करावे, असे आवाहन प्रताप होगाडे, प्रा. शाम पाटील, वर्धमान सिंघवी, शरद कांबळे, अ‍ॅड. धैर्यशीलराव पाटील, गो. पि. लांडगे आदींनी केले आहे.