कोणाच्या घरातील देवघरात दिवा पेटलेला नाही.. तर कोणी घराबाहेर पडण्याच्या मन:स्थितीत नाही.. साहेबांसोबत अनुभवलेल्या क्षणांनी कोणाला गहिवरून आलेले.. कोणी अंतिम संस्कारावेळी साहेबांवर प्रेम करणाऱ्या लाखोंची गर्दी पाहून विस्मयचकित झालेले..
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनंतात विलीन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी या धक्क्यातून स्थानिक नेते व पदाधिकारी अद्यापही सावरू शकलेले नाहीत. मुंबईतील ‘न भूतो..’ अशा अंतिम यात्रेचे साक्षीदार झाल्यानंतर बाळासाहेबांवर केवळ शिवसैनिकच नव्हे तर, सर्वसामान्य आणि सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांचे कसे भरभरून प्रेम होते, याची त्यांना अनुभूती आली. मध्यरात्री मुंबईहून परतलेल्या बहुतांश शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी आपले दैनंदिन कामकाज बंद ठेवत आपल्या मनांतील अस्वस्थता अधोरेखित केली.
शिवसेनाप्रमुखांचे निधन झाल्याचे वृत्त समजल्यानंतर आ. बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड व सुनील बागूल, माजी महानगरप्रमुख अजय बोरस्ते, अर्जुन टिळे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बहुतांश शिवसैनिक मुंबईला रवाना झाले होते. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व मनसेचे आ. वसंत गिते यांच्यासह मनसेचेही अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनाप्रमुखांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मुंबईला गेले होते. मुंबईहून बहुतेक शिवसैनिक व पदाधिकारी मध्यरात्रीच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाले. दु:खामुळे सोमवारी त्यातील बहुतेकांना दैनंदिन उपक्रम सुरू करणेही अवघड गेले.
शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख अर्जुन टिळे हे त्यापैकीच एक. सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांनी भोजनही केले नव्हते. बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर बंद झालेले त्यांच्या घरातील देवघर अद्याप उघडण्यात आलेले नाही. देवासमोर दिवाही लावण्यात आलेला नाही. ओझरखेड येथील त्यांच्या मंदिरातील दिवे तीन दिवसांपासून मालविलेले आहेत. सोमवारी दुपारी मातोश्रीवरून दूरध्वनी आला. मंगळवारी जिल्हाप्रमुखांची मुंबईतील शिवसेना भवनात बैठक आहे. त्यामुळे सकाळी पुन्हा मुंबईला जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या अंतिम संस्कारावेळी एक विलक्षण अनुभव त्यांना आला. बाळासाहेबांच्या पुरोगामी विचारांची शिवसैनिकांनी कायम अनुभूती घेतली. परंतु साहेबांना अंतिम निरोप देताना कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात तो गुण कसा रुजला आहे, हे दिंडे यांनी कथन केले. बाळासाहेबांची शुश्रूषा करणारे चंपासिंग थापा, रवी म्हात्रे, रवी दोडे यांच्यासह लीलावती रुग्णालयातील दर्शन, विजय व आशीष या सर्वाना अंतिम संस्काराप्रसंगी बोलावून विधींमध्ये सामावून घेण्यात आले. कोणतेही रक्ताचे नाते नसताना उद्धवसाहेबांनी संबंधितांना दिलेली ही वागणूक निश्चितपणे सर्वसामान्यांविषयी त्यांची आस्था दाखविणारी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांनी तर अनुभव कथन करणे अवघड असल्याचे सांगितले. एखाद्या व्यक्तीवर इतकी माणसं एवढे प्रेम करू शकतात याची अनुभूती आली. अलोट गर्दीत प्रत्येकाला एकच आस होती की, साहेबांचे अंतिम दर्शन करता यावे, साहेबांच्या सजविलेल्या रथास स्पर्श करून नतमस्तक होता यावे. प्रचंड गर्दी व चेंगराचेंगरीसारख्या स्थितीत सर्व जण देहभान विसरून चालत होते. त्यात केवळ शिवसैनिक नव्हते तर, गरिबातील गरीब व श्रीमंतातील श्रीमंत अशा व्यक्तींचा समावेश होता, असे निरीक्षण बागूल यांनी मांडले. शिवसेनाप्रमुख आता आपल्यात नाहीत, हे कळल्यावर आईपासून घरातील सर्व सदस्य ढसाढसा रडायला लागले. रविवारी सर्व जण टीव्हीसमोर बसून होते. सोमवारी आपणही सिद्धेश्वर मंदिरातील दर्शन वगळता इतर कोणतेच कार्यक्रम केले नाहीत, असेही बागूल यांनी नमूद केले.
माजी महानगरप्रमुख अर्जुन टिळे यांची व कुटुंबीयांची वेगळी अवस्था नव्हती. शिवसेनाप्रमुखांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर राजकारणाशी फारसा संबंध नसलेली आपली पत्नी व दोन मुलीही रडायला लागल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी कोणताही दिनक्रम सुरू न करता ते घरीच थांबले. शिवसेनाप्रमुख हे आम्हा सर्व शिवसैनिकांचे दैवत होते. आता हे दैवत नसल्यावर आम्हाला कोण सांभाळणार, असा सवाल त्यांनी केला. अंतिम यात्रेच्या वेळी मुंबईतील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियाही त्यांनी नमूद केल्या. त्यांनादेखील बाळासाहेबांच्या जाण्यामुळे असुरक्षितता वाटत आहे. शिवसेनाप्रमुखांचा सर्वावर वचक होता. त्यामुळे व्यापारी वर्गाला बाळासाहेबांचा मोठा आधार वाटायचा. तो आधार गेल्यामुळे मुंबई असुरक्षित झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केल्याचे टिळे यांनी नमूद केले. रविवारी मुंबईतील अंतिम यात्रेत सहभागी झालेल्या सेना व मनसेतील इतर अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी सोमवारी दुपापर्यंत बंद होते.