मनमाड शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे हाती घेण्यात आलेली मनमाड पूरक वाढीव पाणीपुरवठा योजना पुढील दोन महिन्यांत कार्यान्वित होईल, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ही योजना कार्यान्वित झाल्यास पाणीपुरवठय़ाची क्षमता तिपटीने वाढणार आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आायोजित मनमाड पाणीपुरवठा आढावा बैठक भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी मनमाडच्या पाणी प्रश्नावर चर्चा करण्यात आली. मनमाड शहराची सध्याची लोकसंख्या ९ लाख २५ हजार इतकी असून नगरपालिका २० ते २२ दिवसांआड पाणीपुरवठा करते. विद्युतपुरवठय़ातील अडचणींमुळे अद्याप काही भागांत २६ दिवस उलटले तरी पाणीपुरवठा झालेला नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणात सध्या १० दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. याच पद्धतीने पाण्याचे वितरण सुरू राहिले तर जुलै अखेपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकतो. जूनमध्ये पालखेड धरणाचे एक आवर्तन सोडण्यात येणार आहे. यामुळे यंदा मुबलक स्वरूपात पाणी असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
कालव्याच्या प्रत्येक आवर्तनानुसार पाटोदा तलावात पाणी घेण्यात येते व वाघदर्डी धरणात पाणी सोडण्यात येते. पाटोदा येथून १६ किलोमीटरच्या जलवाहिनीद्वारे वाघदर्डी धरणात पाणी आणून अंतर्गत वितरण व्यवस्थेने मनमाडला पुरविले जाते. नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे क्षमता तिपटीने वाढविण्यात येणार आहे. या योजनेसाठी एकूण ३७ कोटी ६७ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित होता. राज्य शासनाने ३० कोटी १४ लाख रुपये मंजूर करून तो निधी उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित रक्कम ही लोक वर्गणीतून जमा करण्यात आली. ही योजना सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावी, असे आवाहन भुजबळ यांनी केले.
सध्या शहर परिसरात पाणीपुरवठा समाधानकारक असून अद्याप एकही टँकर सुरू नाही. तसेच, मनमाडकरांना भेडसावणाऱ्या विजेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली. पुढील दीड ते दोन महिन्यांत सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून योजना कार्यान्वित केली जाणार असल्याचे सांगितले. मनमाड शहरात मुबलक पाणी आहे. मात्र वितरण पद्धतीत सुधारणा करून शेतीला व पिण्यासाठी चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते, असेही ते म्हणाले.
शिवसेनेचे आंदोलन
मनमाडच्या विस्कळीत पाणीपुरवठय़ाच्या मुद्दय़ावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत सोमवारी आंदोलन केले. शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा, त्यातच पाणीपट्टीत झालेली वाढ, आरोग्य व्यवस्था यावर ताशेरे ओढत शिवसैनिकांनी एकात्मता चौकात जुन्या पालिका इमारत परिसरात आंदोलनास सुरुवात केली. या प्रश्नांवर दोन दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास शिवसेनेचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देऊन आमरण उपोषणाला बसतील, असा इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmad water supply scheme will be complete in two months
First published on: 27-05-2014 at 07:29 IST