स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळालेल्या उपराजधानीत अनेक वस्त्या शौचालयाविना असल्याने पावसाळ्यात त्या वस्त्यांमध्ये दरुगधीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे रोगांची लागण होण्याची भीती आहे.
 महापालिकेतर्फे विविध प्रकल्प राबविले जात असताना शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्यावर्षी स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळालेल्या उपराजधानीत विविध वस्त्यांमध्ये आजही अनेक लोक उघडय़ावर शौचास बसत असल्याची माहिती मिळाली. शहर आणि परिसरात अनधिकृत लेआऊटची संख्या मोठय़ा प्रमाणात असून त्यातील अनेक लेआऊट्सवर झोपडपट्टीधारकांनी कब्जा केला आहे. रस्त्यावर भीक मागणारे आणि निराधार गरीब लोकांनी शहरातील विविध भागातील मोकळ्या जागेवर बस्तान मांडले असून ही मंडळी शौचालय नसल्यामुळे मोकळ्या जागेचा किंवा रस्त्याच्या कडेचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे काही वस्त्यांमध्ये दरुगधीचे प्रमाण वाढले आहे.
शहरातील अनेक झोपडपट्टीबहुल असलेल्या वस्त्यांमध्ये शौचालयांची व्यवस्था नाही. काही ठिकाणी आहेत तर त्यांची अवस्था काही चांगली नाही. आठ-आठ दिवस त्याची स्वच्छता केली जात नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या हद्दीत एक ते दीड हजार नागरिक दररोज सकाळी उघडय़ावर शौचास बसतात. ग्रामीण भागातील नागरिक मोकळ्या जागा, मैदानांचा वापर शौचासाठी करतात. नागपूर शहरासारखे शहर देखील त्यात मागे नाहीत. राज्यातील उपराजधानीचे हे शहर ‘मिनी मेट्रो’ दिशेने वाटचाल करीत आहे. आंतरराष्ट्रीय विमातळाला संलग्नित मिहान, सेझ येथे होऊ घातलेले आहे. परंतु हजारो लोकांना उघडय़ावर शौचास जावे लागत आहे.  शहरात साडेपाच लाखावर घरे आहेत. यापैकी आठ ते दहा हजार घरांमध्ये आजही शौचायलयाची व्यवस्था नसल्याची महिती मिळाली. महापालिकेतर्फे २४ वस्त्यांमध्ये सावजानिक शौचालये बांधण्यात येणार होती. मात्र, त्यापैकी केवळ ४ ते ५ वस्त्यांमधील कामे पूर्णत्वास आली.
शहरात यशवंत स्टेडियम, टेकडी रोड, उमरेड रोड, वर्धा मार्ग, अमरावती मार्गावर मोकळ्या जागेवर अनेक गरीब लोकांनी झोपडय़ा उभारल्या आहेत. मात्र, त्या ठिकाणी शौचायलयांची व्यवस्था नसल्यामुळे मिळेल त्या जागेचा शौचासाठी वापर होत आहे. शहरातील विविध भागात आजही सकाळच्यावेळी अनेक लोक उघडय़ावर शौचास बसत असतात आणि त्या भागात जाऊन सफाई केली नाही तर त्यांना नोटीस दिली जात असल्याचे एका सफाई कामगाराने सांगितले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many colonies in nagpur city do not have proper toilets
First published on: 01-08-2014 at 12:36 IST