शहरात ठिकठिकाणी निघालेल्या स्वागतयात्रा.. त्यात वैविध्यपूर्ण वेशभूषेत सहभागी झालेले बालगोपाळ.. कुठे लेझिमच्या तर कुठे टाळ-मृदुंगांच्या तालावर धरला गेलेला ठेका.. फटाक्यांची आतषबाजी अन् पुष्पवृष्टीने केले जाणारे स्वागत.. यात्रेच्या स्वागतासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या रांगोळ्या.. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी वाटण्यात आलेली वृक्ष .. पाडव्यानिमित्त रंगलेल्या गायकांच्या मैफिली.. अशा साहित्य, सांस्कृतिक विचारांची देवाण घेवाण करत वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सोमवारी मराठी नववर्षांचे स्वागत अभूतपूर्व उत्साहात करण्यात आले. शहर परिसरातील घराघरांत गुढय़ा व तोरणे उभारून गुढी पाडवा साजरा करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, स्वागत यात्रेच्या माध्यमातून मतदार जागृती करण्यात आली.
गुढी पाडवा अन् नववर्ष स्वागत यात्रा हे समीकरण आता उत्तर महाराष्ट्रात रूढ होऊ लागले आहे. नाशिकमध्ये तर या दिवसाचे बाज काही वेगळाच असतो. मागील काही दिवसांपासून चाललेल्या तयारींचा आविष्कार या यात्रांमधून अधोरेखीत झाला. इंदिरानगर भागात अतिशय कल्पकतेने नियोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, मतदाराला लोकशाही, मतदान प्रक्रिया यांचे महत्व कळावे यासाठी मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. भल्या पहाटे पासून निघालेल्या स्वागत यात्रांनी शहर परिसरातील वातावरणाचा नूर बदलला. नववर्ष स्वागत यात्रा समितीच्यावतीने परिसरातून इंदिरानगर, सदिच्छानगर, राजीवनगर परिसर, चेतनानगर आणि सिडको या ठिकाणाहून नऊ नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आल्या. शोभा यात्रेत अश्वधारी झाशीची राणी, बाल शिवराय यांच्यासह राष्ट्रीय व्यक्तींच्या वेशभूषेत बालगोपाळ सहभागी झाले. काहींनी चित्ररथाच्या माध्यमातून मतदानाचा जागर जिवंत देखाव्यातून केला. या यात्रांचा समारोप लेखानगर येथील बालभारती कार्यालयाच्या आवारात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सच्चिदानंद शेवडे उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल तीन व्यक्ती तसेच पाच संस्थांना स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, गंगापूर रोड परिसरात सावरकरनगर, विद्या विकास सर्कल, तिडके कॉलनी, कॉलेजरोड परिसर, महात्मानगर, संभाजी चौक या ठिकाणाहून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या सर्व यात्रांचा कॉलेजरोड परिसरातील इझी डे मॉलच्या रस्त्यावर समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिवाकर कुलकर्णी, मीना गरीबे उपस्थित होते. शोभायात्रेत परिसरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
मुला-मुलींच्या लेझीम पथकाने ढोल ताशाच्या गजरात लेझीमची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच चिमुकले झाशीची राणी, राम, सीता, कृष्ण आदींच्या वेशभूषेत सहभागी झाले. काही ठिकाणी स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. महिला वर्गाने फुगडीचा मनमुराद आनंद लुटल्याचे पहावयास मिळाले. भगव्या झेंडय़ांमुळे वातावरण भगवेमय झाले होते. यात्रेचे स्वागत करण्यासाठी स्थानिक नागरिकही रस्त्यावर आले होते.
सामाजिक वनीकरण विभागाने गुढी पाडव्याचे औचित्य साधून वृक्ष लागवड व पर्यावरणाचे महत्व यांचा प्रचार करण्यासाठी अनंत कान्हेरे मैदानावर शासकीय दरात कडुलिंब, कृष्णतुळस, बेल, कवठ, खाया, पुत्रजिवा, अर्जुनसादडा, कदंब, रिठा, मोहगणी, सिल्वर ओक, अमलतास आदी वृक्षांची रोपे सवलतीच्या दरात वितरीत केली. विविध सामाजिक, संस्था, नागरिकांनी त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचे परिक्षेत्र लागवड अधिकारी एम. टी. शर्मा यांनी सांगितले. पाच ते सहा तासात तब्बल दोन हजार रोपांची विक्री झाली. त्यात कडुलिंब, बेल, कृष्णतुळस व वड या रोपांची संख्या १८०० इतकी होती. उर्वरित १०३ रोपे ही आवळा, बेहेडा आदींचे असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi new year celebrated in nashik
First published on: 01-04-2014 at 07:33 IST