टीव्ही व चित्रपटसृष्टीत मराठी तरुणांना काम करण्याची मोठी संधी आहे. एक मालिका तयार करताना किमान १०० लोक काम करतात. त्यामुळे इथे कारकीर्द करण्यास भरपूर वाव आहे. मात्र मराठी मुले घराबाहेर पडण्यास तयार होत नाहीत, अशी खंत अभिनेते चिन्मय उद्गीरकर यांनी व्यक्त केली. निफाड तालुक्यातील चांदोरी येथील क. का. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान आणि संगणक महाविद्यालयात वार्षिक सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी क. का. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष काशिनाथ टर्ले, वाघ तंत्रनिकेतनचे प्राचार्य पी. टी. कडवे, प्राचार्य एम. बी. झाडे आदी उपस्थित होते. मराठी चित्रपटसृष्टी अतिशय व्यापक असून प्रेक्षकांसमोर फक्त कलाकार दिसतात म्हणून त्यांचे कौतुक केले जाते. परंतु त्या पाठीमागे राबणारी एक विशाल यंत्रणा असते. ‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेने आपणांस घराघरापर्यंत पोहोचविले, असेही उद्गीरकर यांनी सांगितले.
बाळासाहेब वाघ यांनी, प्रत्येक क्षेत्रात संधी उपलब्ध असून त्या संधीचे सोने तरुणांनी केले पाहिजे, असे आवाहन केले. संस्थेने परफॉर्मिग आर्ट व ड्रामा हे नवीन अभ्यासक्रम नाशिक येथे सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.  प्रा.  पूनम काशिद यांनी प्रास्ताविक केले. अमर आहेर व गौरव शहा यांनी अहवाल मांडला. प्राचार्य प्रा. संतोष वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले.