‘मंत्री करा हो! – कार्यकर्त्यांचा ठराव; डॉ. निलंगेकरांची मूकसंमती’, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या छायाचित्रासह गेल्या २७ डिसेंबरला ‘लोकसत्ता’च्या मराठवाडा वृत्तान्तमध्ये हे वृत्त प्रसिद्ध होताच निलंगा परिसरात त्याची चर्चा टिपेला पोहोचली. निलंगा विधानसभा मतदारसंघात महत्त्वाच्या ठिकाणी या वृत्ताच्या झळकलेल्या होर्डिग्जमुळे या चर्चेत भरच पडली.
माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव व पक्षनिष्ठेची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करावा, असा ठराव निलंगा तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घेण्यात आला. या बाबतचे हे वृत्त होते. गेल्या २७ डिसेंबरला प्रसिद्ध झालेल्या या वृत्तामध्ये, डॉ. निलंगेकर यांनी आपणास निवडणूक लढवण्याची अजिबात इच्छा नव्हती. परंतु पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी आग्रह केल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो, असे ते नेहमी सांगत असल्याचा उल्लेख होता. सोनिया गांधींनी स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरविले असताना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा ठराव तालुका काँग्रेसने करण्याची काय गरज आहे? अशी टिप्पणी या वृत्तात करण्यात आली होती. मराठवाडा वृत्तान्तमधील या वृत्ताची निलंगा विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण लातूर जिल्ह्य़ात जोरदार चर्चा रंगली. अनेक जागरूक वाचकांनी या वृत्ताबद्दल अभिनंदनाचे दूरध्वनी केले. मनसेनेही या वृत्ताची विशेष दखल घेतली. मनसेचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी मराठवाडा वृत्तान्तमधील या वृत्ताचे मोठे होर्डिंग तयार करून निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळसह विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांत झळकावले. साळुंके यांनी स्वत:चे छायाचित्र टाकून त्यांच्या पद्धतीने मार्मिक टिप्पणीही केली आहे. मराठवाडा वृत्तान्तमधील वृत्ताची लोक किती आस्थेने दखल घेतात, याचेच हे प्रातिनिधिक उदाहरण होय.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2013 रोजी प्रकाशित
निलंगा मतदारसंघात झळकले ‘मराठवाडा वृत्तान्त’चे होर्डिग!
‘मंत्री करा हो! - कार्यकर्त्यांचा ठराव; डॉ. निलंगेकरांची मूकसंमती’, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या छायाचित्रासह गेल्या २७ डिसेंबरला ‘लोकसत्ता’च्या मराठवाडा वृत्तान्तमध्ये हे वृत्त प्रसिद्ध होताच निलंगा परिसरात त्याची चर्चा टिपेला पोहोचली.
First published on: 05-01-2013 at 01:11 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathwada vruttant heading appear in nilanga constituency