काकीनाडा-मुंबई रेल्वे घोषित केल्याप्रमाणे नांदेडमार्गे न्यावी, तसेच पुण्यासाठी दैनंदिन रेल्वे सुरू करून औरंगाबाद-उस्मानाबाद प्रवासीगाडी तत्काळ सुरू करण्यात यावी, अशा मागण्या करून मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी १ जून रोजी बैठकीचे आयोजन केले आहे.
सन २०१३ च्या रेल्वे अर्थसंकल्पात काकीनाडा-मुंबई रेल्वे आठवडय़ातून दोन वेळेस नांदेडमार्गे नेण्याचे जाहीर करण्यात आले. परंतु आता ही गाडी नांदेडऐवजी सिंकदराबाद-विखाराबाद वाढीव मार्गे नेली जाणार आहे. मध्य रेल्वेचे अतिरिक्त वाहतूक प्रबंधक ब्रिजेश रॉय यांनी यास दुजोरा दिला असल्याची माहिती संघटनेचे अरुण मेघराज यांनी दिली.
सिकंदराबादहून विखाराबादमार्गे मुंबईसाठी अनेक गाडय़ा धावत असताना नांदेड मार्गावर मुंबई धावणारी गाडी वळविण्यात आली. ही बाब मराठवाडय़ाच्या प्रवाशांवर अन्याय करणारी आहे. औरंगाबादसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ६ दरम्यान व परळीसाठी ११ ते सायंकाळी ५पर्यंत एकही गाडी उपलब्ध नाही. आंध्रातून काही गाडय़ा रात्री-बेरात्री धावतात, हे मराठवाडय़ातील प्रवाशांच्या गैरसोयीचे आहे.
नांदेडकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या गाडय़ांची मागणी केल्यास ट्रॅक उपलब्ध नाही, रॅक नाहीत, फिटनेस सुविधा नसणे, रेल्वे कर्मचाऱ्याची कमतरता, प्लॅटफार्मची उपलब्धता आदी कारणे पुढे केली जातात. मराठवाडय़ातील रेल्वे प्रवाशांवरील दक्षिण मध्य रेल्वेकडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. या निर्धाराने शनिवारी संध्याकाळी परभणीत बैठक होणार आहे.