नवी दिल्ली येथील सामूहिक बलात्कारात बळी पडलेली पीडित युवती व देशभरातील महिलांवर होतअसलेल्या अत्याचाराविरुध्द भारतीय नौजवान सभा, ऑल इंडिया स्टुडंट्स् असोसिएशन व भारतीय महिला फेडरेशनच्या वतीने गुरुवार, ३ जानेवारी व शनिवार ५ जानेवारी अनुक्रमे कोल्हापूर व जयसिंगपूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती गिरीष फोंडे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
नवी दिल्ली येथे सामूहिक बलात्काराच्या अत्याचाराची बळी ठरलेल्या २३ वर्षीय पीडित युवतीचे २९ डिसेंबर रोजी पहाटे  निधन झाले. दिल्लीमधील या घटनेसह देशभरात महिला अत्याचाराची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेचा अभाव, कायदा आणि सुव्यवस्थेची दारुण स्थिती आणि एकूणच व्यवस्थेची स्त्रियांबद्दलची असंवेदनशीलता यातून त्यांच्या मूलभूत हक्कांवरच मर्यादा आल्या आहेत. तरी याच्या निषेधार्थ भारतीय नौजवान सभा, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन व भारतीय महिला फेडरेशनच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेस गिरीष फोंडे, ज्योती भालकर, शिवाजी माळी, राहुल कांबळे, अनुराधा पाटील, सारिका तळेकर, रविराजा पाटी, उमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.