येथील तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सयराम कोळसे यांनी कार्यकाळ संपल्यामुळे पक्षश्रेष्ठी राजेश परजणे यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला. दि. ३० रोजी बाजार समितीची सर्वसाधारण सभा होत असून त्यादिवशी सभापती-उपसभापतीची निवड होण्याची शक्यतो असून सभापती पदासाठी परजणे गटाचे संजय शिंदे, तर उपसभापती पदासाठी काळे गटाचे मुरलीधर वाकचौरे यांची नावे आघाडीवर आहेत.
बाजार समितीत ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे गटाचे सहा, आमदार अशोक काळे गटाचे सहा, राजेश परजणे गटाचे तीन, व्यापारी मतदार संघाचे दोन, तर हमाल-मापाडी संघाचे एक असे संचालकांचे बलाबल आहे. सध्या बाजार समितीत काळे-परजणे गटाचे उत्तम औताडे सभापती, तर सयराम कोळसे उपसभापती म्हणून काम पाहत आहेत. सभापती औताडे यांची एक वर्षांची कारकीर्द वादग्रस्त ठरली, त्यांच्या काळात विकासात्मक कामे फारशी झाली नाहीत. त्यांच्याच गटाचे संचालक त्यांच्या निवडीवर नाराज होते. औताडे यांच्यावर बारा संचालकांनी अविश्वासाचा ठराव आणला होता. मात्र, आमदार काळे यांनी त्यांना काम करू दिले, तर संचालकांची नाराजी तीव्र होती. तशा तक्रारीही आमदार काळे यांच्याकडे वेळोवेळी करण्यात आल्याचे सर्वानी अनुभवले आहे. ठरल्याप्रमाणे आज परजणे गटाचे उपसभापती कोळसे यांनी युवक नेते राजेश परजणे यांच्याकडे कार्यकाळ (दि. १७) संपल्यामुळे राजीनामा सुपूर्त केला. बाजार समितीचे सभापती पद आता परजणे गटाकडे येणार आहे. सहा महिन्यांसाठी हे पद परजणे गटाकडे राहणार आहे, दुष्काळी स्थितीमुळे बाजार समितीची सहा महिने मुदतवाढ मिळू शकते. त्यामुळे आता परजणे गटाकडून सभापती पदासाठी संजय शिंदे, तर आमदार अशोक काळे गटाकडून उपसभापतीपदासाठी मुरलीधर वाकचौरे यांची नावे आघाडीवर आहेत. दि. ३० रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.