सोमवार, १४ एप्रिल रोजी मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार असून रात्रीच्या सुरुवातीला पूर्व दिशेला हस्त नक्षत्रात साध्या डोळ्यानीही मंगळ ग्रह पाहता येणार आहे. या दिवशी मंगळ पृथ्वीच्या अगदी जवळ म्हणजे ९ कोटी २४ लाख किलोमीटरवर असेल. या दिवशी पौर्णिमेचा चंद्र आणि मंगळ यांची युती होणार असूून मंगळ चंद्राच्या सुमारे तीन अंश उत्तरेकडील बाजूस दिसणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. या अगोदर ५ मार्च २०१२ रोजी मंगळ पृथ्वीच्या जवळ (१० कोटी ८ लाख किलोमीटर) आला होता. आता यानंतर मंगळपुन्हा  ३० मे २०१६ रोजी पृथ्वीच्या जवळ (७ कोटी ५३ लाख किलोमीटर) येणार आहे. भारताने पाठविलेले ‘मंगळयान’ मंगळाकडे प्रयाण करत असून आत्तापर्यंत त्याने अर्धे अंतर यशस्वीपणे पार केले असल्याचेही सोमण यांनी सांगितले.