शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) बांधण्यात आलेल्या ई-लायब्ररीचा खर्च ५ कोटींवरून १४ कोटींवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे एखाद्या बांधकामावर दुपटीहून जास्त खर्च होतोच कसा? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
मेडिकलमध्ये चार वषार्ंपूर्वी विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी ई-लायब्ररी बांधण्याचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी मुंबईला पाठवण्यात आला. त्याला मंजुरी प्राप्त झाली आणि ५ कोटी रुपये देण्यात आले. दोन वर्षांनंतर ई-लायब्ररीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु तोपर्यंत या इमारतीला तब्बल आठ कोटी रुपये खर्च आला. तीन कोटी रुपये अधिकचा खर्च झाल्यानंतरही ई-लायब्ररीचे काम मात्र पूर्ण झाले नाही. अशा स्थितीत या इमारतीचे उद्घाटन एक वर्षांपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले.
इमारत बांधल्यानंतर त्यात संगणक, फर्निचर व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ६ कोटी ६९ लाख रुपयांची गरज असल्याची माहिती पुढे आली आहे. तसा प्रस्तावही मुंबईला पाठवण्यात आला आहे. परंतु पाच कोटींच्या इमारतीसाठी १४ कोटी ७० लाखांचा खर्च कसा होऊ शकतो, हे अनाकलनीय असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जागतिक पातळीवरचे वैद्यकीय ज्ञान आत्मसात करण्याची संधी मेडिकलमधील विद्यार्थ्यांना मिळावी. कौशल्य व ज्ञानपूर्ण डॉक्टर निर्माण व्हावे, या हेतूने मेडिकलच्या तत्कालीन अधिष्ठाता डॉ. विभावरी दाणी यांनी ‘ई-लायब्ररी’ ही संकल्पना पुढे आणली होती. २००७ मध्ये झालेल्या हीरक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी तत्कालीन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी यासाठी ५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे त्यांनी निधीही उपलब्ध करून दिला. २ हजार ७९९ चौरस मीटर जागेत ई-लायब्ररीच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. परंतु ई-लायब्ररीसाठी ही जागा कमी पडत असल्याची बाब पुढे आली. यानंतरचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी ४ हजार १०६ चौरस मीटरमध्ये दोन मजले असलेल्या इमारतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला. २५ फेब्रुवारी २०११ रोजी ७ कोटी ९८ लाख ८९ हजार रुपये खर्चाच्या वाढीव प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली. अशा पद्धतीने इमारतीच्या बांधकामासाठीच ८ कोटी रुपये खर्च झाले. त्यामुळे या इमारतीचे बांधकामच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
इमारतीमध्ये संगणक, फर्निचर नसल्याने त्याचा कुणालाही लाभ घेता येत नाही. त्यामुळे संगणक व फर्निचरसाठी ६ कोटी, ६९ लाख, १४ हजार रुपयांचा नवीन प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. परंतु मुंबई स्तरावर हा प्रस्ताव प्रलंबित आहे. सध्या मेडिकलमध्ये ५५ हजार पुस्तके आहेत. ही सर्व पुस्तके संगणकात साठवून ठेवण्यात येणार होती. याशिवाय अभ्यास करताना विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर कॉल आल्यास संवाद साधण्यासाठी ई-लायब्ररीच्या मध्यभागी ‘गार्डनयुक्त मोबाईल झोन’ राहील, असेही ठरवण्यात आले होते. तसेच ही ई-लायब्ररी राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न करण्यात येणार होती. परंतु या सर्व घोषणा अद्यापही कार्यान्वित झाल्या नाहीत. या इमारतीत टेबल, खुच्र्या लावून वाचनकक्ष तयार करण्यात आला आहे.
या पलीकडे कोणत्याही सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पुढे येत असतानाच मेडिकलचे वरिष्ठ अधिकारी मात्र या इमारतीचे बांधकाम आपल्या कार्यकाळातील नसल्याचे सांगून कानावर हात ठेवत आहेत.