कराड विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्यावर ज्यांनी आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी शनिवारी (दि. १९) विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर सभा होणार आहे. सभेत आंदोलनाची पुढील दिशाही ठरविण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खोटे बोलत असल्याचा आरोपाचा पुनरुच्चार पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. त्या संदर्भातील कागदपत्रेही त्यांनी सादर केली. त्याच मुद्दय़ावरून डॉ. पाटणकर यांच्यावर ज्यांनी आरोप केला. त्यांना उत्तर देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कृती समितीतर्फे अशोकराव थोरात, पंजाबराव पाटील, आंनदराव जमाले यांनी बाजू मांडली.
आनंदराव जमाले म्हणाले की, डॉ. पाटणकर  यांच्यावर आरोप करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो आहोत. त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही मेळावा घेत आहोत. त्या मेळाव्याच्या व्यासपीठावर त्यांनी येऊन डॉ. पाटणकर खोटे आहेत हे सिध्द करावे. विमानतळ विस्तारवाढबाबत शासनाशी झालेला पत्रव्यवहार थोरात यांनी निदर्शनास आणून दिला.