मेळघाटातील गाविलगड किल्ल्याची पडझड सुरूच असून पुरातत्व खात्यानेही या किल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याने शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेल्या या किल्ल्याचे सौंदर्य नष्ट होत आहे.
बहामनी, इमादशाही, निजामशाही, मोगल आणि मराठे यांची सत्ता अनुभवणारा हा किल्ला अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार ठरला आहे. शत्रूंच्या हाती लागू नये म्हणून शूर स्त्रियांनी केलेला जोहार, इंग्रज सेनापती जनरल ऑर्थर वेलस्ली याची व्यूहनीती गावीलगडाने पाहिली. १८०३ चे मराठय़ांविरोधातील युध्द इंग्रजांनी वेलस्लीच्या नेतृत्वाखाली गाविलगडावर लढले. स्थापत्य कलेच्या दृष्टीने या किल्ल्याचे महत्व वेगळेच. भव्य, सुंदर दरवाजे, मजबूत इमारती, तलाव, तोफांची ओळ, प्रार्थनास्थळे हे किल्ल्याचे वैभव होते. १८५७ मध्ये तात्या टोपे यांना बंडादरम्यान या किल्ल्याचा वापर करण्यास वाव मिळू नये म्हणून या किल्ल्याला उध्वस्त करण्याचा प्रयत्न इंग्रजांनी करून पाहिला. त्यानंतर हा किल्ला दुर्लक्षितच राहिला. आज हा किल्ला भग्नावस्थेत आला आहे. पर्यटकांसाठी अनमोल ठेवा असलेल्या या किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याने हा किल्ला ढासळत चालला आहे. हा किल्ला पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. मात्र, किल्ल्याच्या संरक्षणासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. गुप्तधन शोधणाऱ्यांनी ठिकठिकाणी खोदकाम सुरूच ठेवले आहे. त्यांना रोखणारे कुणीही नसल्याने किल्ल्याच्या परिसरातील भगदाडे पर्यटकांचा भ्रमनिरास करीत आहेत.
गाविलगड किल्ल्यावर पूर्वी मोठय़ा दहा ते बारा तोफा होत्या. त्यापैकी आता सहा तोफाच किल्ल्यावर आहेत. मात्र, तोफांची मोडतोड करण्याचाही प्रयत्न समाजकंटकांनी चालवला आहे. तटबंदीच्या आत पाच तलाव आहेत. या किल्ल्याला पाणीपुरवठा करणाऱ्या या तलावांपैकी तीन तलावांमध्ये पाणी साठलेले दिसते, पण ते पिण्यायोग्य नाही. बुरूज आणि दरवाजे आजही या किल्ल्याच्या भव्यतेची साक्ष देत असले तरी एकेक भाग ढासळत चालला आहे. या किल्ल्यात बारुदखाना, राणी महाल, राणी झरोखा, तेलखाना, धान्यखाना, जनानखाना, हत्तीखाना, जामा मशिद या इमारती आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. या इमारतींची वेळीच डागडुजी न केल्यास त्यांच्या अस्तित्वालाही धोका पोहोचू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
इतिहासकार फरिस्ता यांच्या नोंदीनुसार बहामनी राजा बादशाह अहमदशाह वली याने १४२५-१४२६ दरम्यान हा किल्ला बनवला. त्याआधी या ठिकाणी अहिर नावाच्या गवळी राजाने याच ठिकाणाहून सत्ता सांभाळली. त्यामुळे या किल्ल्याला गवळीगड म्हटले जाऊ लागले आणि नंतर अपभ्रंश होऊन त्याचे गाविलगड झाले. १५ व्या शतकात हा बहामनी राज्याचा एक भाग होता. पुढे अहमदनगरच्या राजाने हा किल्ला जिंक ला. बऱ्हाणपूरचा राजा महमदशाह फरुकी याने किल्ल्यावर हल्ला केला, पण अहमदनगरच्या राजाने तो हाणून पाडला. नंतर हा किल्ला अकबराच्या अधिपत्याखाली आला. मग काही काळ तो निजामाकडे होता. त्यानंतर १६३६ ते १६८० या काळात तो मोगलांच्या ताब्यात होता. १८०३ मध्ये ब्रिटिश सेनापती जनरल वेलस्ली याने किल्ल्यावर हल्ला चढवला. अनेक महत्वाच्या ऐतिहासिक घटनांची साक्ष असलेला हा किल्ला भव्य आहे, पण पुरातत्व खात्याचे या किल्ल्याकडे दुर्लक्ष आहे. नामफलकाखेरीज पुरातत्व खात्याचे अस्तित्व कुठेही जाणवत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Melghat gavilgad fort
First published on: 04-02-2014 at 09:21 IST