रिझव्‍‌र्ह बँकेने काही र्निबध घातल्यानंतर धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २० पैकी १५ शाखांचे नजीकच्या शाखांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आधीही पाच शाखांचे अन्य ठिकाणी विलीनीकरण झाले आहे.
वाढती स्पर्धा, खर्च कमी करण्यासाठीचे नियोजन आणि अन्य सोई-सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय घोणसे-पाटील यांनी दिली.
एप्रिल महिन्यापासून कोअर बँकिंग सिस्टीम कार्यान्वित करणे गरजेचे असून या प्रणालीसाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. बँकेच्या ज्या शाखांमध्ये आर्थिक-बँकिंग व्यवहार अल्यल्प आहेत, अशा शाखांचे भाडे, वीज बिल आणि विविध कर तसेच खर्च कमी करण्याचा प्रयत्न आहे.
बँकेच्या प्रशासकीय मंडळाच्या सभेत २० शाखांचे अन्य ठिकाणी विलीनीकरण करण्याचा निर्णय झाला. शहरातील पाच शाखांचे एक फेब्रुवारीपासून अन्य शाखांमध्ये विलीनीकरण झाले आहे. एक मार्चपासून १५ शाखा बंद करून त्यांचे विलीनीकरण अन्य शाखांमध्ये झाले आहे.
विलीनीकरणाआधीची शाखा व कंसात ज्या ठिकाणी विलीनीकरण झाले ती शाखा पुढीलप्रमाणे – विखरण (अर्थे, शिरपूर), मांजरोद (थाळनेर, ता. शिरपूर), सांगवी (बोराडी, शिरपूर), लोणखेडा फॅक्टरी (मुख्य शाखा,
शहादा), न्याहळोद (जुने धुळे), निमगुळ (शिरूड), खेडे (कुसुंबा, धुळे), विंचूर (बोरकुंड,
धुळे), इंदणे (दुसाणे, साक्री), धनेर (दहीवेल, साक्री), दिघाने (कासारे, साक्री), सामोडे
(पिंपळनेर, साक्री), पुष्पदंतेश्वर (लहान शहादे), नंदुरबार (खोंडामळी), निमगुळ (दोंडाईचा, शिंदखेडा) आणि भालपूर (जुने दोंडाईचा).