सायन-पनवेल महामार्गावरील खारघर येथील टोलनाक्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बेकायदा टोल ठरवून उशिरा का होईना आपला विरोध दर्शविला आहे. मनसेच्या जिल्हाध्यक्ष अतुल भगत व पदाधिकाऱ्यांनी सायन-पनवेल महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कडेकोट बंदोबस्तामध्ये कळंबोली मॅक्डोनाल्डमध्ये दिले. मनसे खारघर टोलविरोधी असल्याचे समजताच निवेदनाच्या नावावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चार पोलीस ठाण्यांचे बळ महामार्गालगत उभे केले होते.
महामार्गावरील टोलवसुलीबाबत केंद्र सरकारच्या नियमांवर बोट ठेवून खारघर येथे उभारलेला टोल बेकायदा असल्याचे जिल्हाध्यक्ष भगत यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. खारघर येथे नोव्हेंबर महिन्यात टोलवसुली सुरू होणार असल्याच्या अफवेमुळे मनसेने हे निवेदन देण्याचे आंदोलन हाती घेतले. शेकाप, आरपीआय, शिवसेना, भाजप या राजकीय पक्षांनी टोलला विरोध केलेला नाही. मात्र टोलची जागा आणि स्थानिकांना टोलमधून सूट यासाठी या राजकीय पक्षांनी याअगोदरच खारघर टोल हा मुख्य मुद्दा बनविला आहे. गुरुवारी मनसे आंदोलन करणार असे समजल्यामुळे पोलिसांनी तालुक्यातील मुख्य पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधक कारवाईच्या नोटिसा बजावल्याने मनसेसैनिक आंदोलनापूर्वीच गारद झाले. मनसेच्या वतीने महामार्ग प्राधिकरणाला निवेदन देण्याचा कार्यक्रमही त्यासाठी पोलिसांनी कळंबोलीच्या मॅक्डोनाल्ड हॉटेलच्या बाहेर करून घेतला. त्यावेळी मनसेचे ३० कार्यकर्ते आणि शंभर पोलीस उपस्थित होते.
सतर्क पोलीस
पोलिसांनी महामार्गावरील कळंबोली येथील मॅक्डोनाल्ड हॉटेल परिसरात बंदोबस्त लावल्याने दुपारी काही तासांसाठी मॅक बंद करण्यात आले होते. तेथे पोलीस छावणीचे रूप होते. तैनात पोलिसांची नजर तेथे उभ्या असणाऱ्या मारुती स्विफ्टमोटारीवर गेली. पोलीसमित्र असे ओळखपत्र त्या मोटारीमध्ये लावले होते. तसेच एका मोटारीमध्ये पोलीस नव्हते. मात्र पोलीस अधिकाऱ्याची टोपी होती. पोलिसांनी या दोन्ही मोटारींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या मते प्राणिमित्र असतात, पोलीसमित्र अशी कोणतीही अधिकृत संघटना पोलिसांची नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onमनसेMNS
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns opposed kharghar toll booth
First published on: 01-11-2014 at 01:07 IST