उड्डाण पुलाचे संथगतीने सुरू असलेले बांधकाम, जल तसेच मलवाहिनीच्या दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी मानकापूरमध्ये रास्ता रोको केल्याने कोराडी मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती.
मानकापूर रिंग रोडवर उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असून ओरिएंटल स्ट्रक्चर इंजिनिअर कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. कंपनीने काम मुदतीत पूर्ण केलेले नाही. कासवगतीने काम सुरू असून किमान सहा महिन्यात ते पूर्ण होण्याची शक्यता नाही. उड्डाण पुलाचे काम पूर्ण न झाल्याने वाहतुकीला त्याता त्रास होत आहे. रिंग रोड चौकात जल तसेच मलवाहिनी फुटली आहे. पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने खड्डेही पडले आहेत. त्यामुळे परिसरात दुगर्ंध पसरत आहे. ओरिएंटल, ओसीडब्ल्यू तसेच महापालिका अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन देऊनही त्यांनी त्यावर काहीच कार्यवाही केली नाही. त्यातच मंगळवारी रात्री तेथे प्राणांतिक अपघात घडला. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मानकापूर चौकात रास्ता रोको केला.
कार्यकर्त्यांनी रस्त्यातच ठाण मांडल्याने गिट्टीखदान, जरीपटका, कोराडी व सदर या चारही दिशांकडील वाहतूक दोन तास ठप्प पडली होती. कोराडी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्ता मोकळा करण्यास सांगितल्याने कार्यकर्ते संतप्त झाले होते.
गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बोंडे यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. संबंधित अधिकाऱ्यांसोबत दोन दिवसात चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यामुळे कार्यकर्त्यांचे समाधान झाले आणि त्यांनी रस्ता मोकळा केला. मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हाध्यक्ष चंदू लाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विश्वनाथ देशमुख, प्रणव घोरमारे, महेश जोशी, सुभाष कोंडलवार, प्रतीक नायडू प्रामुख्याने सहभागी झाले होते.