अंधेरीच्या डीएननगर पोलीस ठाण्यात दोन मॉडेल्सनी धिंगाणा घालत महिला पोलिसांना शिवीगाळ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या दोन्ही मॉडेल्सवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सीसी टीव्ही कॅमेऱ्यात त्यांचा हा तमाशा कैद झाला आहे.
 २३ मे रोजी पूजा मिश्रा आणि श्रुती गुप्ता या दोन मॉडेल्स आपल्या महागडय़ा गाडीतून न्यू वर्सोवा लिंक रोडवर एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एका गाडीतून आलेल्या चार तरुणांनी त्यांची छेड काढली. त्यावरून श्रुती आणि पूजा यांची त्यांच्याशी बाचाबाची झाली. गस्तीवरील बीट मार्शलने या सर्वाना पोलीस ठाण्यात आणले. त्या गोंधळाचा फायदा घेऊन हे चारही तरुण पोलीस ठाण्यातून निसटले. त्यामुळे श्रुती आणि पूजा या दोघींचा तोल घसरला आणि त्यांनी पोलीस ठाण्यातच धिंगाणा घालत महिला पोलिसांना अपशब्द उच्चारण्यास सुरुवात केली. त्या अमली पदार्थाच्या अमलाखाली असण्याच्या शक्यतेने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी एक महिला पोलीस नेत होती, पण तिलाही त्यांनी धक्काबुक्की केली. हे तरुण पळाल्यानंतर नाकाबंदी करून त्यांना पकडून पुन्हा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्या तरुणांनी छेड काढल्याचा इन्कार केला. मॉडेल्सच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. पण सरकारी कामात अडथळा, धमकी, शिवीगाळ, पोलिसांना मारहाण केल्यामुळे विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Models in police station
First published on: 30-05-2015 at 06:52 IST