ट्रॉम्बे येथील वीजप्रकल्पातील संच क्रमांक सहा या सध्या तेल आणि वायूवर चालणाऱ्या ५०० मेगावॉट क्षमतेच्या वीजनिर्मिती संचाचे आधुनिकीकरण करण्याचा कार्यक्रम ‘टाटा पॉवर कंपनी’ने हाती घेतला आहे. त्यामुळे या वीजसंचातून मिळणाऱ्या विजेचा निर्मिती खर्च ४० ते ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. परिणामी सध्याच्या तुलनेत वीजग्राहकांना आठ ते नऊ टक्क्यांचा लाभ वीजदरात होईल.
ट्रॉम्बे येथे टाटा पॉवर कंपनीचा १४३० मेगावॉट क्षमतेचा वीजप्रकल्प आहे. त्यात ५०० मेगावॉटचे दोन, १८० मेगावॉटचा एक तर २५० मेगावॉटचा एक असे चार वीजनिर्मिती संच कार्यरत आहेत. पैकी संच क्रमांक सहा हा ५०० मेगावॉटचा वीजनिर्मिती संच केवळ तेल आणि वायू या इंधनावर चालतो. तेल आणि वायूचा खर्च जास्त आहे. त्यामुळे या संचातील वीजनिर्मितीचा खर्च सरासरी नऊ रुपये प्रति युनिट इतका येतो.त्यामुळे आता या वीजसंचाचे आधुनिकीकरण करून तो कोळशावर चालवण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजनिर्मितीचा खर्च नऊ रुपयांवरून पाच रुपये प्रति युनिट इतका खाली येईल. परिणामी वीजग्राहकांना वीजदरात त्याचा लाभ होईल, असे ‘टाटा पॉवर’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी ११७४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. वीजनिर्मितीनंतर कोळशाच्या राखेचा त्रास परिसरात होऊ नये यासाठी ‘फ्लू गॅस डिसल्फरायझेशन’ ही विशेष यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे राखेच्या उत्सर्जनाचे प्रमाण नियंत्रणात राहील, असा दावा ‘टाटा पॉवर’ने केला आहे. या बाबत पर्यावरणविषय जनसुनावणी १५ जानेवारी २०१३ रोजी होणार आहे. सकाळी ११ वाजता चेंबूर येथील आर. सी. एफ क्रीडा केंद्र येथे ही सुनावणी होईल. २०१५ च्या आरंभी ५०० मेगावॉटच्या या संचाचे आधुनिकीकरणाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.