सांगली-माधवनगर रस्त्यावरील रेल्वे पुलावर झालेल्या भीषण अपघातप्रकरणी सांगली पोलिसांनी तब्बल चार दिवसांनी मोहन पाटील यांना मंगळवारी अटक केली. मोहन ऊर्फ प्रताप सोपान पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील यांचे बंधू असल्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत होता. मात्र पोलिसांनी निरपेक्ष चौकशी करून अटकेची कारवाई केली.
शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी रेल्वे उड्डाण पुलावर सुमो आणि रिक्षा यांची धडक होऊन झालेल्या अपघातात द्वारका पिसे, शमा शेख या दोन महिलांसह चित्ररंजन बुवा, रिक्षाचालक सरदार मुलानी असे चारजण ठार झाले होते. अपघातानंतर टाटा सुमो गाडीचा चालक फरारी होता. याप्रकरणी राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र पोलिसांनी वैद्यकीय चाचणी आणि सीसीटीव्ही फुटेजचे चित्रण पाहिल्यानंतर मंगळवारी मोहन पाटील यांना अटक केली.
या अपघातप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन पाटील यांना वाचविण्यासाठी राजकीय प्रयत्न होऊन बदली चालक देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप झाला होता. दगडू लोखंडे या चालकाने अपघातादरम्यान आपणच चालकपदावर असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी सबळ पुरावे गोळा करूनच कायदेशीर कारवाई केली.