मुंबई या जागतिक शहराला उरण तसेच अलिबागला जोडणाऱ्या जलमार्गातील उरणच्या मोरा व अलिबागच्या रेवस बंदरातील वर्षांनुवर्षे साचलेला गाळ ही मोठी अडचण होऊ लागली असून गाळ वाढल्याने येथील वाहतुकीवर परिणाम होऊन ओहोटीच्या वेळी सलग तीन ते चार दिवस ही वाहतूक बंद ठेवावी लागत आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने शंभर वर्षांपूर्वीची गाळ काढण्याची पद्धत बंद करून ब्लोरिंग या आधुनिक पद्धतीचा वापर करून दोन्ही बंदरांतील गाळ काढावा, अशी मागणी कोकणवासीय उत्कर्ष संस्थेने मेरिटाइम बोर्डाच्या
बंदर अधिकाऱ्यांकडे केली
आहे.
उरण, मोरा ते भाऊचा धक्का, मुंबई ही जलसेवा बारमाही सुरू असते. पावसाळ्यातील चार महिने वगळता रेवस (अलिबाग) ते भाऊचा धक्का ही जलसेवा आठ महिने सुरू असते. त्यामुळे रायगड जिल्हय़ातील तसेच कोकणातील अनेक ठिकाणच्या प्रवाशांना जलवाहतुकीच्या मार्गाने स्वस्तात तसेच आनंददायी प्रवास करण्याची सोय उपलब्ध आहे. सध्या या जलमार्गावरील तिकीट दरात वाढ झालेली असली तरी तीन ते चार तासांचा तसेच वाहतूक कोंडीत अडकून पडून त्रासदायक प्रवास करण्यापेक्षा या मार्गावरील अनेक प्रवासी जलमार्गालाच प्राधान्य देत आहेत. ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या या जलवाहतुकीत मोरा तसेच रेवस बंदरातील चिखलाचा गाळ काढण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून लाखो रुपयांच्या निविदा काढून गाळ काढला जात असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही बंदरांतील गाळ कमी झालेला नाही. त्यामुळे दर पंधरा दिवसांनी येणाऱ्या ओहोटीच्या वेळी या मार्गावरील वाहतूक सेवा बंद करावी लागते.
याचा परिणाम दररोज मुंबईत रोजगार तसेच व्यवसायासाठी जाणाऱ्या शेकडो चाकरमान्यांना बसत आहे. त्याच्या तुलनेने नौदलच्या करंजा ते मुंबई तसेच जेएनपीटी ते गेटवे ऑफ इंडिया हे दोन्ही प्रवासी मार्ग नियमित सुरू असतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडून आधुनिक तंत्राचा वापर करून काढण्यात येणारा बंदरातील गाळ हा असल्याने महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने अशाच प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा राबवून या दोन्ही बंदरांतील गाळ काढावा, अशी मागणी कोकणवासीय उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष गोपीनाथ चव्हाण यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mora and revasa port mud losses water transport
First published on: 09-12-2014 at 06:51 IST