आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठय़ा संख्येने निवडणुकीच्या कामाला गेल्यामुळे पावसाळापूर्व आरोग्यविषयक कामांचे तीनतेरा झाले आहेत. त्यातच धूम्रफवारणीसाठी आवश्यक असलेल्या डिझेल-पेट्रोलचा पुरवठा लेखापाल विभागाने आटविल्यामुळे डास प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये अडथळा निर्माण होऊ लागला असून डासांचा प्रदुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. त्यातच काही भागांमध्ये मलेरियाचे रुग्णही आढळून आल्यामुळे वेळीच उपाययोजना झाली नाही तर पावसाळ्यात मुंबईच्या अनेक भागांमध्ये साथीच्या रोगांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागातील २०० अधिकारी आणि ३५० कामगार-कर्मचाऱ्यांना १२ मार्चपासून लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पाठविण्यात आले आहे. मतमोजणी होईपर्यंत हे कर्मचारी पालिकेच्या सेवेत परतण्याची शक्यता नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कामाचा पुरता बोजवारा उडाला आहे.
पावसाळ्यात साथीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आरोग्य विभाग दरवर्षी १५ एप्रिलपासून सक्रिय होतो. मुंबईतील सार्वजनिक तसेच खासगी इमारतींमधील पाण्याच्या टाक्या, तसेच पाणी साठण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची पाहणी करून डास प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या जातात. त्याचबरोबर झोपडपट्टय़ांमध्येही जनजागृती केली जाते. परंतु अधिकारी-कर्मचारी-कामगार मोठय़ा संख्येने निवडणुकीच्या कामाला गेल्यामुळे ही कामे यंदा खोळंबली आहेत. निवडणुकीच्या निकालापर्यंत म्हणजे १६ मेपर्यंत हे कर्मचारी पालिकेच्या सेवेत परतू शकले नाहीत तर पावसाळ्यामध्ये आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडण्याची शक्यता आहे.
पेट्रोलियम कंपन्यांकडून थेट डिझेल खरेदी करताना प्रतिलिटर १० ते १२ रुपयांचा भरुदड पालिकेला सोसावा लागत होता. त्यामुळे आता खासगी पंपांवरून डिझेल घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र या निर्णयाचा फटका धूम्रफवारणीला बसला आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत २२७ यंत्रांद्वारे धूम्रफवारणी केली जाते. दिवसभर धूम्रफवारणी करण्यासाठी एका यंत्रात आठ फिलिंग म्हणजेच ३२ लिटर डिझेल आणि ३,२०० मिली लिटर पेट्रोल लागते. परंतु लेखापाल विभागाने धूम्रफवारणीसाठी लागणाऱ्या डिझेलच्या साठय़ात कपात केली आहे. ‘आवश्यकतेनुसारच डिझेल वापरा’, असा सल्ला आरोग्य विभागाला देण्यात आला आहे. परिणामी सध्या एका धूम्रफवारणी यंत्रासाठी निम्मे म्हणजे १६ लिटर डिझेल आणि १,६०० मिलिलिटर पेट्रोल दिले जाते. यंत्रातील इंधनाचा साठा संपल्यानंतर कर्मचारी काम बंद करतात. परिणामी उर्वरित परिसरात धूम्रफवारणी होतच नाही. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या भागातही हाच प्रकार घडत आहे. परिणामी अनेक विभागांतील धूम्रफवारणी अर्धवटच होत आहे. सध्या उन्हाचा तडाखा असल्यामुळे फारसा फरक पडत नसला तरी पावसाळ्यात सुरुवातीपासून डासांचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. परिणामी साथीच्या आजारांना आयतेच आमंत्रण मिळणार आहे.