वेकोलितर्फे पारशिवनी तालुक्यात गोंडेगाव, घाटरोहना, इंदर, कामठी येथे कोळसा खाणी चालवल्या जातात. या सर्व खाणींमुळे परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, नागरिकांची पिळवणूक होत आहे. या समस्या सोडवण्यासाठी वेकोलिचे अधिकारी कुठलेही प्रयत्न करत नाही. त्यामुळे या समस्या सोडवून घेण्यासाठी वेकोलिबाधित प्रकल्पग्रस्त, शेतकरी व नागरिक संघर्ष समितीतर्फे ११ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून गोंडेगाव येथे बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार आशिष जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वेकोलिने १९९४ मध्ये गोंडेगाव खाणीसाठी जुनी कामठी व घाटरोहणा येथील अधिग्रहित केलेल्या जमिनीचा २० वर्षांंनंतरही शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही. तसेच प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्याही दिल्या नाहीत. हा मोबदला व नोकऱ्या त्वरित देण्यात याव्यात. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत तीन हजाराहून १४ हजार रुपयापर्यंत वाढ करावी. गोंडेगावचे पुनर्वसन करण्यात यावे. वेकोलिच्या कोळशाच्या वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीमुळे व कणांमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. नुकसान होत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. या सर्व खाणींमधील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जमा होऊन शेतजमीन नापीक होत आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच त्यांची शेतजमीन आजच्या बाजारभावाने खरेदी करून शेतकऱ्यांना नोकरी द्यावी. वेगवेगळ्या विभागाने व प्रचलित कायद्याने ज्या अटी घातलेल्या आहेत, त्याचे पालन वेकोलिने करावे.
खाण सुरक्षा महासंचालक व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ वेकोलि करीत असलेल्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत आहे. या दोन्ही संस्थेने वेकोलिवर कारवाई करावी. कोळशाची वाहतूक करत असताना कोळशाला पूर्णपणे न झाकणे, ओव्हरलोडिंग  करणे, वाहतूक करणारे वाहन अनेक गोष्टींनी परीपूर्ण असणे आवश्यक असताना अवैधरीत्या कोळशाची वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे जीव जात आहे. तसेच परिसरात पसरत असलेल्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या विषयावर वेकोलि प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी. वेकोलिच्या अवैध वाहतुकीमुळे अनेक रस्त्यावर खड्डे तयार झाले आहे. तसेच अनेक जुने रहदारीचे रस्ते बंद केले आहे. हे रस्ते दुरुस्त करून द्यावे, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही जयस्वाल यांनी याप्रसंगी दिला. यावेळी अ‍ॅड. गजानन आसोले, गेंदालाल गुप्ता उपस्थित होते.