नदीजोड प्रकल्पांतर्गत खा. हेमंत गोडसे यांनी सिन्नर तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार योग्य असला तरी या प्रारूप आराखडय़ात वैतरणा धरणाचा स्रोत असणाऱ्या काही नद्यांचा समावेश असल्याने इगतपुरी तालुक्यातील पाणी प्रश्नाकडेही खासदारांनी लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग परिसरातून व्यक्त होत आहे.
वैतरणा धरणाचे ‘अतिरिक्त’च्या नावाखाली पाणी घेण्याचा हेतू असल्याचा दावा वैतरणा परिसरातील शेतकऱ्यांनी केला असून तसे असल्यास विरोध करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पाणी नेण्यास विरोध नसला तरी वर्षांनुवर्षे प्रलंबित असणाऱ्या प्रकल्पबाधितांच्या समस्यांवर कोणताही निर्णय घेण्यास शासन तयार नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वैतरणा अप्पर दगडी धरणांतर्गत बाधित २२ गावांचे सुमारे १५०० हेक्टर क्षेत्र अद्यापही मूळ मालक किंवा त्यांच्या वारसदारांना परत मिळालेले नाही.
१९७८ मध्ये यासंदर्भातील आदेश देण्यात येऊनही अंमलबजावणीस ३५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला. यासह प्रकल्पबाधितांचा बारमाही पिण्याचा व शेतीला पूरक पाणी देण्याची मागणी वर्षांनुवर्षे प्रलंबित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शेवगेडांगचे सरपंच साहेबराव उत्तेकर यांनी इगतपुरी हा महाराष्ट्राच्या नकाशावरील संपूर्णपणे प्रकल्पबाधित तालुका असल्याने तालुक्यातील गावागावांमध्ये प्रकल्पामुळे समस्या निर्माण झाल्या असल्याचे नमूद केले आहे. या समस्या सोडविल्यास स्थानिकांमधील असंतोष कमी होईल. गोडसेंच्या नदीजोड प्रकल्पाचे त्यांनी स्वागत केले आहे. तर, दुसरीकडे कुऱ्हेगावचे उपसरपंच ग्यानेश्वर धोंगडे यांनी खासदारांनी सिन्नरसह इगतपुरी तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. केवळ सिन्नरच्या हितासाठी इगतपुरीचे पाणी वळविले जाणार असेल तर ते सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
इगतपुरी तालुक्यातील या समस्या सोडविण्यासाठी गोडसे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात खासदारांना भेटण्याचा निर्णयही शेतकऱ्यांनी घेतला आहे.

More Stories onखासदारMP
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mps demanded to attention igatpuri
First published on: 22-05-2015 at 01:41 IST