शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या आरोग्याची तपासणी दर आठवडय़ाला करण्याची मोहीम सृष्टी एन्व्हायर्न्मेंट अ‍ॅन्ड सस्टेनेबलिटी सोसायटी (सेस) या संस्थेतर्फे हाती घेण्यात येणार आहे. त्याअंतर्गत विठ्ठलवाडी ते संगम पुलादरम्यान चार ठिकाणी पाण्यातील विद्राव्य प्राणवायूचे (डिझॉल्व्हड ऑक्सिजन) प्रमाण तपासले जाणार असून, याबाबतचा साप्ताहिक अहवालही प्रसिद्ध केला जाणार आहे.
‘सेस’ चे अध्यक्ष संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की पुणे शहराची पर्यावरणीय स्थिती व त्यावरील उपाय यावर जनमत समजून घेण्याचा उपक्रम ‘सेस’ व इतर संस्था राबवित आहेत. जलप्रदूषण, नद्या-जलाशये यांचा ऱ्हास, घनकचरा प्रश्न अशा विविध समस्यांचे निराकरण करणे ही या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत. शहरातील काही शाळांना त्यांच्या आसपास असणाऱ्या नाले, तळी तसेच कालव्यातील जलचाचणीसाठी यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या उपक्रमाची सुरुवात २५ डिसेंबरपासून होणार आहे. तसेच या उपक्रमाच्या विस्तारीकरणात राज्यातील प्रमुख नद्यांचा जल-आरोग्य अहवाल नागरिकांच्या माहितीसाठी देण्यात येईल. यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने भाग घेण्याचे आवाहन जोशी यांनी केले. परिणामकारक वृत्तांकनासाठी ‘सेस’ संस्थेतर्फे ‘डॉ. मोहन कोडरकर जलपत्रकारिता’ पुरस्कार देण्यात येणार आहे, असेही या वेळी जोशी यांनी सांगितले.