मासळीच्या प्रजननाचा कालावधी वाढविण्याची मागणी मुंबई तसेच इतर विभागातील मच्छीमारांनी केली असली तरी रायगड जिल्ह्य़ासह मुंबई परिसरातील मासेमारी मात्र शासनाच्या नियमानुसार १५ जूनपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय सोमवारी मुंबईत झालेल्या मच्छीमार सोसायटय़ांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती करंजा मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी दिली आहे.
केंद्र तसेच राज्य सरकारकडून पावसाळ्यातील मासेमारीवर १५ जून ते १५ ऑगस्ट या मासळीच्या प्रजनन काळात बंदी घातली जाते. मात्र या बंदीचा कालावधी कमी असल्याने मासळीचे प्रमाण कमी होऊ लागले असून यात वाढ केल्यास मासळीच्या संख्येत वाढ होऊन मासळीचा दुष्काळ कमी होण्यास मदत होईल, अशी भूमिका काही मच्छीमारांनी घेतली असून १५ मेपासूनच मासेमारीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त येताच  सोमवारी मुंबईत करंजा, रेवस, मुंबईतील माहूल, कुलाबा आदी परिसरांतील मच्छीमार सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मच्छीमारीवरील बंदी शासनाच्या नियमानुसारच करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अशा प्रकारे शासनाचे आदेश निघण्यापूर्वीच बंदी घातल्यास मच्छीमारांचे नुकसान होऊ शकते, तसेच सध्याच्या परिस्थितीत मासेमारी करण्यासाठी लागणारे कर्मचारीही कमी झाले असून असलेल्या कर्मचाऱ्यांना रोजगार मिळावा, तसेच मासेमारी करणाऱ्यांना मे महिन्यातील मासेमारीतून फायदा व्हावा याकरिता शासनाच्या निर्णयानुसारच जून ते ऑगस्टदरम्यानच्या बंदीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती नाखवा यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onरायगडRaigad
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbairaigad fishing will continue till 15 june
First published on: 06-05-2014 at 07:13 IST