पुणे व पिंपरी- चिंचवड या कुबेर महापालिकांनी शेतीच्या पाण्याला हात न लावता आपल्या मालकीची धरणे बांधावीत, अशी टिप्पणी पाणीपुवरठा व जलनि:सारण मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी गुरुवारी केली. दोन्ही पालिकांकडून मोठय़ा प्रमाणावर पाणी दूषित करण्याचे काम होत असल्याचेही ते म्हणाले.
इंडियन वॉटर असोसिएशनच्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ढोबळे बोलत होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव राधेश्याम मोपलवार, किलरेस्कर ब्रदर्सचे अध्यक्ष संजय किलरेस्कर, असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष व्ही. आर. कल्याणकर, मावळते अध्यक्ष आर. एन. गुप्ता,
त्याचप्रमाणे कोमल प्रसाद, बी. डी.
यमगार आदी पदाधिकारी त्या वेळी उपस्थित होते.
ढोबळे म्हणाले,‘‘पुणे व पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून मोठय़ा प्रमाणावर पाणी दूषित केले जाते. पुणे पालिका धरणातून प्रतिदिन अकराशे दशलक्ष लिटर पाणी उचलते. त्यातील ५८० दशलक्ष लीटर पाणी सांडपाणी म्हणून सोडून दिले जाते. पाणी शुद्ध कसे राहील याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. मुळात पालिकांनी शेतीच्या पाण्याला हात न लावता आपल्या मालकीची धरणे बांधावीत.’’
सध्याची पाण्याची स्थिती सांगताना ते म्हणाले,की राज्यात १४ जिल्हे दुष्काळी आहेत. ९३८ गावांमध्ये पाणीटंचाई आहे. १३३२ टँकर पाण्यासाठी काम करत आहेत. शेती, सहकार व पाण्यासाठी उत्तम काम करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक होता; तेथे आज पाण्यासाठी वणवण करावी
लागत आहे. मान्सून, बदललेले हवामान, पर्यावरण संतुलन, या सर्व गोष्टी त्यास
जबाबदार आहेत.