धार्मिक ठिकाणांच्या स्वच्छतेत पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला अपयश

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरातील धार्मिक ठिकाणे आणि गोदापात्र परिसर स्वच्छ ठेवण्याची महापालिकेची जबाबदारी वाढली असताना वास्तवात पालिकेची आरोग्य यंत्रणा त्यात कमी पडत असल्याचा निष्कर्ष गुरू आस्था फाऊंडेशनने काढला आहे.

गुरू आस्था फाऊंडेशनचा आरोप   
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरातील धार्मिक ठिकाणे आणि गोदापात्र परिसर स्वच्छ ठेवण्याची महापालिकेची जबाबदारी वाढली असताना वास्तवात पालिकेची आरोग्य यंत्रणा त्यात कमी पडत असल्याचा निष्कर्ष गुरू आस्था फाऊंडेशनने काढला आहे. गोदावरी नदीपात्र प्रदूषित होऊ नये म्हणून पालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असले तरी गोदापात्रातच अन्नदान करणाऱ्यांवर अटकाव करण्यात येत नसल्याने बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांमधून अन्न घेऊन जाणे, पाण्यातच त्या पिशव्या धुणे, इतकेच नव्हे तर, रात्रीच्या वेळी नदीपात्रात मद्यपान करून बाटल्या तशाच टाकून निघून जाणे, असे प्रकार सर्रासपणे होत आहेत. या प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ ही घोषणा वास्तवात आणण्यात महानगरपालिकेचा आरोग्य विभाग कमी पडत असल्याचा आरोप गुरू आस्था फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सारिका गिस्ता यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी व कर्तव्य योग्य रीतीने पार पाडले तरच खऱ्या अर्थाने आपला परिसर व नाशिक शहर स्वच्छ, कचरामुक्त व पर्यायाने रोगमुक्त होईल. परंतु प्रत्यक्षात तसे न घडता सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासकीय यंत्रणेवरच असल्याचे प्रत्येकाचे मत असल्याने पूर्वापार चालत आलेल्या परंपरेने ही जबाबदारी महानगरपालिकाच कसोशीने पेलण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी महानगरपालिकेचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचेही फाऊंडेशनने म्हटले आहे.
सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून प्रशासकीय स्तरावर नियोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य विभागावर असून सदर विभाग शहरातील स्वच्छतेबाबत गंभीर नसल्याचे सव्‍‌र्हेक्षणातून निदर्शनास आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कुंभमेळ्यात देश-विदेशातून भाविक व पर्यटक लाखोंच्या संख्येने दाखल होणार आहेत. त्यामुळे वेळीच उपाययोजना न केल्यास ऐनवेळी साफसफाई करणे कितपत सोयीस्कर राहील किंवा खऱ्या अर्थाने काम होईल काय, याची ग्वाही देता येणार नाही. स्वच्छ नाशिक हे केवळ सिंहस्थ कालावधीपुरता मर्यादित असू नये. त्यादृष्टीने नियमित स्वरूपात उपाययोजना करण्याची आवश्यकता नागरिकांना वाटत आहे. स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक ही संकल्पना केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात येण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. शहर भिकारीमुक्त करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनासह नाशिककरांचीही आहे, असे नमूद करून फाऊंडेशनने काही सूचना केल्या आहेत.
गोदावरी पात्रात रामकुंड परिसरात सफाई कर्मचारी पूर्णवेळ कार्यरत असावेत. नदी पात्राच्या भोवताली असलेल्या धार्मिक स्थळांच्या परिसरात भिकारी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. भिकारी आढळल्यास कठोर कारवाई करावी. अन्नदान करू इच्छिणाऱ्या भाविक तसेच संस्थांनी अन्नदान करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. स्वच्छ भोजन पात्रात अन्न देऊन नियोजित-नियुक्त केलेल्या स्थानावरच आदराने बसवून खाण्यास द्यावे. त्या जागी शुद्ध पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतेची व्यवस्था असावी,  पादचाऱ्यांना अन्नदान करू नये. कारण पादचारी चालताना अन्न भक्षण करून हातात शिल्लक राहिलेले अन्न हे रस्त्यात टाकत असल्याने ते पायदळी येत असते. गांधी तलावालगत असलेली चौपाटी तसेच गोदापात्रालगत असलेल्या उपाहारगृहांना स्वच्छतेबाबतचे योग्य ते निर्देश द्यावेत. नियमांचा भंग करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी. वेळप्रसंगी परवाना रद्द करावा. भाविक व पर्यटकांनी कचरा हा निर्माल्य कलशातच टाकणे सक्तीचे करावे. रात्रीच्या वेळेस नदीपात्रालगत मोकळ्या परिसरात कोणत्याही मद्यपीला वा भिकाऱ्याला, बाहेरून आलेल्या यात्रेकरूस अन्नपदार्थ खाण्यास मनाई करावी.  अशा मंडळींच्या सोयीसाठी नदीपात्रालगतच्या मोकळ्या परिसरात अन्नपदार्थ खाण्यासाठी जागा निश्चित करावी. या ठिकाणी निर्माल्य कलश, शुद्ध पिण्याचे पाणी यांसह स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, अंध, अपंग, निराधार, वयोवृद्धांसाठी शासनाच्या वतीने राहण्याची, जेवणाची परिसरात स्वतंत्र ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी. अशा मंडळींसाठी आधारश्रम बांधण्यात यावे. दानधर्म करणाऱ्या भाविकांना, संस्थांना त्या ठिकाणी जाऊन दान देण्याची सूचना करावी, अशा सूचना फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Municipal corporation system failure to keep cleanliness in religious places