लोहगाव पोलीस चौकीजवळ सोमवारी पहाटे झालेल्या तरुणाच्या खुनाचा गुन्हा पोलिसांनी चोवीस तासांत उघडकीस आणला आहे. याप्रकरणात चौघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने दहा दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.  उमेश मारुती गावडे (वय २१), सत्यानारायण उर्फ आकाश दत्तात्रय गवळी (वय १९), अंकुश शांताराम गोटे (वय २१) आणि रोहित विनोद अगरवाल (वय २१, रा. चक्रपाणी वसाहत रस्ता, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या घटनेत मनोहर बंडू निंबाळकर (वय २३, रा. मोझे आळी, लोहगाव) या तरुणाचा खून झाला होता. याप्रकरणी त्याचा भाऊ सोमनाथ निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे.  खूनाची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस तेथे पोहचले. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस निरीक्षक अरुण वालतुरे यांनी गुन्ह्य़ाचा तपास सुरु केला.