हडपसर येथील शंकरमहाराज मठाजवळील एका इमारतीमध्ये सुरक्षारक्षकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. काही दिवसांपूर्वी सुरक्षारक्षकाने चोरी करताना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा राग मनात ठेवून हा खून केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
रुपेन दादा कर्डक (वय ६०, रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे खून झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. त्यांचा खून केल्याच्या आरोपावरून प्रवीण हनुमंत साळुंके (वय २६, रा. अपना घर सोसायटी, खराडी) याला अटक करण्यात आली आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील शंकरमहाराज मठ जवळील पवार हाइट्स येथील व्यावसायिक इमारत असून या ठिकाणी कर्डक हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. काही दिवसांपूर्वी या इमारतीमध्ये साळुंके याला कर्डक यांनी संगणकाची चोरी करताना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मंगळवारी रात्री साळुंके हा मद्यपान करून एका मुलीस घेऊन या इमारतीत आला होता. त्याच्या हातात शस्त्र असल्याने त्या ठिकाणी दहशत निर्माण करत असल्यामुळे कर्डक व नागरिकांनी त्याला इमारतीत प्रवेश नाकारला. संध्याकाळी कर्डक हे या इमारतीच्या पार्किंमध्ये झोपलेले असताना त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. या प्रकरणी साळुंकेला काही तासात अटक केली असून त्याने गुन्हा कबूल केला असून त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे जाधव यांनी सांगितले.