अनेकांना अनेक सवयी असतात मात्र आपल्या कमाईतील काही रक्कम खर्ची घालत व आर्थिक झळ सोसत पनवेल येथील ८२ वर्षीय मधू पाडळकर यांनी हजारो ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह केला आहे.  ऐतिहासिक वस्तूंचे जतन करून संस्कृती जपणाऱ्या या अवलियाने तब्बल ६३ वर्षे यासाठी खर्ची घातली आहेत. त्याकरिता त्यांनी आपल्या घरातच या वस्तूंचे संग्रहालय उभारले आहे.
पनवेल शहरातील म्हात्रे अ‍ॅक्संड रुग्णालयाशेजारी असलेल्या परीस या बंगल्यात मधू पाडळकर यांचे हे संग्रहालय आहे. बंगल्यात प्रवेश करताच विविध प्रकारच्या दगडी वस्तूंचे दर्शन होते, यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या जात्यांचा तसेच दगडी उखळींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पुराण काळातील दगडाचे दिवे, दगडी आंघोळीची पात्रही आहेत. तर घरात प्रवेश करताना असलेल्या प्रवेशद्वाराजवळच विविध प्रकारचे लोखंडी, तांबे, पितळेचे दिवे, ढाली तलवार आदी निदर्शनास येतात.
न्यायालयात शिरस्तेदार असलेल्या मधू पाडळकर यांनी अनेक ठिकाणावर भ्रमंती करून भंगारातून तसेच पदपथावरून या वस्तूचा संग्रह केला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक संग्रहाला काही वर्षांपूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी भेट दिलेली होती. आपल्या मागे आपला नातू लोकेश यांनी या संग्रहाचे जतन करून त्यात वाढ करावी व आपल्या संस्कृतीची माहिती पुढील पिढीला द्यावी, अशी इच्छा मधू पाडळकर यांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीड हजारांपेक्षा अधिक वस्तूंचे जतन
मधू पाडळकर यांच्याकडील दीड हजारांपेक्षा अधिक वस्तूंचे जतन त्यांनी घराच्या हॉलमध्ये शोकेश उभारून केले आहे. या शोकेशच्या सर्वात खालच्या भागात मोठमोठी तांब्याची पात्र आहेत. यामध्ये दीडशे वर्षांपूर्वीचा पाणी गरम करण्याचा बंब आहे. या बंबात आजही थंड पाणी गरम करून घेता येते. आदिवासी संगीत वाजविणाऱ्यांचे पितळेचे शिल्प, त्याचप्रमाणे हिंदू-मुस्लीम समाजात पूर्वी वापरात असलेले पवित्र पात्र, विविध प्रकारचे पानाचे डब्बे (उदा. कार व बदकाचे आकार असलेले), अ‍ॅश ट्रे, लायटर (यामध्ये टेबल लायटरचाही समावेश आहे) सिगारेट ओढण्याचे विविध आकारातील पाइप, कंदिलांचे प्रकार, आजच्या काळातही जागतिक वेळ दर्शविणारे वाळूचे घडय़ाळ, होकायंत्र, दुर्मीळ असलेला भातुकलीचा पितळेचा संच, शिवकालीन तसेच पंचमर्जाजपासूनची विविध प्रकारची नाणी, शंख तसेच पितळेच्या ऐतिहासिक वस्तू या संग्रहालयात आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत शासनाने तयार केलेल्या ४३ राजकीय नेते, स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक नेते, देवीदेवतांचे छायाचित्र असलेल्या नाण्यांचा संग्रही त्यांनी केलेला आहे.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Museum in madhu padalkar house at panvel
First published on: 21-05-2015 at 12:24 IST