यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित ‘यशवंतराव चव्हाण-बखर एका वादळाची’ या आगामी चित्रपटातील गाण्यांच्या ध्वनिफितीचे प्रकाशन शुक्रवारी मुंबईत ज्येष्ठ संतुरवादक पं. शिवकुमार शर्मा यांच्या हस्ते झाले. या चित्रपटात ओवी, पोवाडा, लावणी, ते भैरवी अशी विविध बाजाची तब्बल सोळा गाणी आहेत. संगीतकार आनंद मोडक यांनी ही गाणी संगीतबद्ध केली असून हा चित्रपट १४ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.
नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक केंद्रात झालेल्या कार्यक्रमास चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष शरद काळे, एस्सेल वर्ल्ड व्हिजनचे बिझनेस हेड निखिल साने, चित्रपटात यशवंतराव चव्हाण यांची भूमिका करणारे अशोक लोखंडे, व्हिडिओ पॅलेसचे नानुभाई, आनंद मोडक आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी पं. शर्मा म्हणाले की, आजच्या काळात आणि त्यातही राजकीय नेत्याच्या जीवनावरील चित्रपटात इतक्या संख्येत गाणी असणे हा एक विक्रमच ठरेल. यशवंतराव चव्हाण हे राजकीय नेते होतेच; पण त्यांना साहित्य, कला, संगीत आदीतही रुची होती. त्याच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब चित्रपटातील विविध प्रकारच्या शैलीतील गाण्यांमधून समोर येते. चित्रपटाच्या संगीतासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि संगीतकार यांच्यात उत्तम संवाद असायला हवा. तसा तो असेल तर किती चांगले संगीत होऊ शकते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे. उर्मिला धनगर, विभावरी जोशी, नंदेश उमप या गायकांनी चित्रपटातील काही गाण्यांची झलक या वेळी सादर केली. अभिनेत्री अमृता सुभाष यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.