नेत्यांमध्ये श्रेय घेण्याची चढाओढ
नगर तालुक्यात पीक विम्याचे श्रेय घेण्यासाठी मोठी चढाओढ सुरू आहे. आमदार शिवाजी कर्डिले व माजी खासदार दादापाटील शेळके या दोघांमध्ये या विषयावरून चांगलाच कलगीतुराही रंगला. या राजकीय साठमारीत शेतकरी मात्र पीक विम्याच्या रकमेपासून अजूनही वंचित आहे. इतर तालुक्यांत या रकमेचे वाटप झाले असले तरी नगर तालुक्यात मात्र त्याची प्रतीक्षाच आहे, त्याकडे मात्र श्रेयाच्या दावेदारांचे दुर्लक्ष आहे.
जिल्ह्य़ात सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातही नगर तालुक्याची स्थिती अधिकच दयनीय आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा आधार आहे. मात्र तो मंजूर होऊनही नगर तालुक्यातील शेतकरी या नुकसान भरपाईपासून दुरापस्तच आहे. डिसेंबरमध्येच मागील वर्षांच्या पीक विम्याची रक्कम मंजूर झाली. राहुरी तालुक्यात दि. २१ डिसेंबरलाच विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. अन्य तालुक्यांतही त्यानंतर त्याचे वाटप सुरू झाले. नगर तालुक्यात मात्र त्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय तलगीतुरा रंगला असताना प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात मात्र ही रक्कम अजूनही पडलेली नाही. जिल्हा बँकेच्या तालुका विकास कार्यालयातच अजूनही हे पैसे जमा न झाल्याचे समजते. विमाधारक शेतकऱ्यांच्या याद्या या कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. मात्र, पैसेच जमा न झाल्याने शेतकरी खेटय़ा मारून कंटाळले आहेत.
नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना ७ कोटी ९५ लाख रूपये मंजूर झाले आहेत. या गोष्टीचे श्रेय घेण्यासाठी नगर तालुक्यात मोठी राजकीय स्पर्धा सुरू आहे. आमदार शिवाजी कर्डिले व माजी खासदार दादापाटील शेळके हे दोघेही जिल्हा बँकेचे संचालक आहेत. मात्र, बँकेने केलेल्या रक्कम वाटपाच्या प्रातिनिधीक कार्यक्रमात शेळके यांना डावलण्यात आले. पुढच्याच दिवशी शेळके यांनी स्वतंत्र कार्यक्रम घेऊन त्यावर टीका केली. त्यात त्यांनी बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर यांच्यावरही थेट आरोप केले. या कलगीतुऱ्यामुळेच हा विषय जिल्ह्य़ात हा चर्चेचा विषय बनला. त्यालाही आता पंधरा दिवस होऊन गेले.
पीक विमा मंजूर झाल्याचे श्रेय घेण्यासाठी एकिकडे नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असली तरी दुसरीकडे शेतकरी मात्र या भरपाईपासून वंचित आहे. त्याकडे एकाही नेत्याचे लक्ष नाही. तालुक्यात त्याचीच आता चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजूनही आठ-दहा दिवस शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागेल.