महापालिकेच्यावतीने नागपूर महोत्सवाच्या निमित्ताने २३ जानेवारीपासून संगीत, नृत्य आणि काव्याचा एक अनोखा कार्यक्रम होणार आहे. यात गायक कैलास खेर यांचे सुफी स्वर आणि शिवमणीच्या तालवाद्यांचा नाद अनुभवण्याची संधी  रसिकांना लाभणार आहे.
या महोत्सवाबाबतचा प्रस्ताव कॅफोकडून मंजूर झालेला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सांगितले की, या महोत्सवासाठी जवळपास एक कोटीचा खर्च असून त्यासाठी मनपा आयुक्तांची परवानगी मिळण्याची वाट आहे. २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असून त्या निमित्ताने या महोत्सवाला सुरुवात होणार असून हा महोत्सव धंतोलीतील यशवंत स्टेडियमवर २८ जानेवारीपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे कैलाश खेर यांचे स्वर आणि शिवमणीचा नाद त्या सोबतच ‘भोजपुरीचा अभिताभ’ म्हणून मनोज तिवारी संगीत व नृत्याचा खास कार्यक्रम सादर करणार आहे. २३ जानेवारीला उद्घाटन झाल्यावर लगेचच नागपूरच्या कलावंतांच्या गायनाचा आणि नृत्याचा कार्यक्रम सादर करणार आहे. विशेष म्हणजे ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा हिंदी, मराठी कलावंतांचा कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आला आहे. हिंदी कविसंमेलनाचे आयोजन २६ जानेवारीला आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी विविध कवींना आमंत्रित करण्यात आले आहे. डॉ. मिर्झा रफी अहमद बेग हे एकमेव मराठी कवी असतील.  या कार्यक्रमाला अभिनेते नाना पाटेकर यांना आमंत्रित  करण्याचा प्रयत्न सुरू आहे तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. संगीताच्या तालावर चित्रकलेचे ‘लाईव्ह डेमोॅस्ट्रेशन’ देणारे नावीन्यपूर्ण कार्यक्रम महोत्सवात होणार आहे. यात स्थानिक कलावंतांचा विशेष सहभाग राहणार आहे.