केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकांनी सोमवारी सकाळी अचानक दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात धडकून झडती सुरू केल्याने सांस्कृतिक वर्तुळात खळबळ उडाली.
आमदार निवासासमोरील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र परिसरात सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास सीबीआयची पथके अचानक धडकली. केंद्र परिसराची प्रवेशद्वारेव कार्यालयाची दारेही बंद करून घेण्यात आली. फक्त तेथील कर्मचारी व अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला. सीबीआयच्या पथकांनी कार्यालयातील विविध फाईली, कागदपत्रे, लेखा पुस्तके, पावती पुस्तके, रोख पुस्तके, धनादेश पुस्तिका, बँक पासबुक, कार्यादेश कागदपत्रे आदींची तपासणी सुरू केली. त्यातील अनेक विशेषत: खर्चविषयक नोंदी बारकाईने तपासल्या जात होत्या. कर्मचाऱ्यांकडून नोंदीनुसार विचारणा केली जात होती. संगणकावरील नोंदीही तपासल्या जात होत्या. दिवसभर घेतलेल्या झडतीत मोठय़ा प्रमाणात कागदपत्रे जप्त
करण्यात आली.  
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे विविध उपक्रम आयोजित केले गेले. त्या कार्यक्रमाचा खर्च अवास्तव दाखविला गेला. बुकेंची देयके लाखो रुपयात होती, कलावंतांकडून तयार करवून घेण्यात आलेल्या कलाकृती विक्रीचा हिशेबच नसणे, विविध कामांच्या कंत्राटापोटी अवास्तव रकमा दिल्या गेल्या, विशिष्ट कंत्राटदारांनाच कामे आदी अनेक तक्रारी सीबीआयकडे आल्या होत्या. या तक्रारीतील उल्लेख डोळे दीपविणारे असल्याने आर्थिक गैरव्यवहाराच्या शंकेने आज झडती घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मात्र, या कारवाईचा तपशील सीबीआयने जाहीर केला नाही. या कारवाईने सांस्कृतिक वर्तुळात
खळबळ उडाली आहे. सीबीआयचे अधीक्षक संदीप तामगाडगे यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी आजची कारवाई केली.