महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे यंदाही निकालाची टक्केवारी फुगली असून विदर्भाचा निकाल ८६.९२ टक्के लागला आहे. त्यातही नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली असून दोन्ही विभागात मुलग्यांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी नागपूर आणि अमरावती विभागाचा निकाल अनुक्रमे ८७.०१ आणि ८६.८४ टक्के लागला आहे. दोन्ही विभागाचा निकाल अनुक्रमे ४ आणि २.७३ टक्क्याने वाढला आहे.
नागपूर विभागात मुलींची संख्या ८० हजार ८३६, तर मुलग्यांचे प्रमाण ७७ हजार १९३ आहे. मात्र, अमरावती विभागात मुलग्यांचे प्रमाण ७८ हजार ५७६ आणि मुलींचे प्रमाण ७३ हजार १९० आहे. नागपूर विभागात मुलग्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८४.०६ टक्के तर मुलींचे प्रमाण ८८.७४ टक्के आहे. अमरावती विभागात मुलग्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८४.८५ टक्के तर मुलींचे ८९.४५ टक्के एवढे आहे.
गेल्या वर्षी नागपूर विभागाचा ८२.९३ टक्के निकाल होता. त्यात वाढ होऊन यावर्षी ८७.०१ टक्के झाला आहे. नागपूर विभागात सर्वात जास्त ८९.७३ टक्के निकाल गोंदिया जिल्ह्य़ाचा असून सर्वात कमी ८२.७२ टक्के निकाल भंडारा जिल्ह्य़ाचा आहे. दुसऱ्या क्रमांकावर नागपूर जिल्हा असून टक्केवारी ८८.९२ टक्के आहे. गडचिरोलीचा निकाल ८६.२६ टक्के, वर्धा जिल्ह्य़ाचा निकाल ८५.९५ टक्के, चंद्रपूरच्या निकालाची टक्केवारी ८४.७४ टक्के आहे.
नागपूर विभागातून एकूण १ लाख ८१ हजार ६१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ५८ हजार २९ विद्यार्थी उत्तीर्ण, तर २३ हजार ५८३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. दहावीच्या निकालात जशी नियमित विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढली तशीच पुनर्परीक्षार्थीची उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारीही वाढली आहे. एकूण १७ हजार ८६६ विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षा दिली. त्यापैकी १७ हजार ८०९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९ हजार २४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पुनर्परीक्षार्थीच्या निकालाची टक्केवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ५१.९३ टक्क्याने वाढली आहे.
गेल्या चार वर्षांची आकडेवारी आणि २०१२ चा अपवाद वगळल्यास दरवर्षीच निकालाची टक्केवारी फुगलेली दिसते. हा फुगवटा अनेक कारणांनी असून यामुळे नेमके काय साध्य होईल, असा प्रश्न शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. २०१२ मध्ये विद्यार्थी नोंदणी १ लाख ८० हजार ४७७ होती. त्यापैकी १ लाख ७९ हजार ६८१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि १ लाख ३३ हजार ९४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णाची टक्केवारी ७४.५५ होती. २०१३ मध्ये नागगूर विभागात १ लक्ष ७६ हजार ९७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १ लाख ७६ हजार ३०० विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातून १ लाख ३० हजार ४३८ म्हणजे, ७३.९९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २०१४ मध्ये १ लाख ७६ हजार ४०० विद्यार्थ्यांपैकी १ लाख ७५ हजार ५२३ विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी १ लाख ४५ हजार ५५७ उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८२.९३ टक्के होती. ती यावर्षी ४.०८ टक्क्याने वाढून ८७.०१ टक्के झाली आहे. पुनर्परीक्षार्थीची उत्तीर्ण होण्याची टक्केवारीही अशीच वाढली आहे. गेल्या वर्षी ४६.२० टक्के होती ती वाढून ५१.९३ टक्के झाली आहे. प्रावीण्यासह प्रथमश्रेणी मिळवणारे नागपूर विभागात २६ हजार ३८९ विद्यार्थी आहेत. प्रथमश्रेणी असलेले ५४ हजार ६१३, द्वितीय श्रेणीवाले ५९ हजार ८९०, तर उत्तीर्ण विद्यार्थी १७ हजार १३७ आहेत.  १८७ शाळांचा १०० टक्के निकाल
दहावीच्या निकालाची उत्सुकता दरवर्षीच असते. त्यातही शून्य टक्के निकाल आणि १०० टक्के निकालाच्या शाळांची संख्याही लक्ष वेधून घेणारी असली तरी या दोन्ही प्रकारच्या शाळांची संख्या नागपूर विभागात लक्षवेधक ठरली आहे. शून्य टक्के निकाल असलेली एकही शाळा नागपूर विभागात नाही तर १०० टक्के निकाल असलेल्या तब्बल १८७ शाळा नागपूर विभागात आहेत, हे विशेष.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी वाढली आहे. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा मान १०० हून अधिक शाळांनी पटकावला आहे. राज्यात २१ टक्के शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे, परंतु नागपूर विभागाने शून्य टक्के निकालाची परंपरा खंडित केली आहे. एकाही शाळेचा निकाल शून्य टक्के नाही. गेल्यावर्षी विभागातील २५ शाळांचा निकाल शून्य टक्के होता. नागपुरातील तब्बल ८४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शहरातील पालक-विद्यार्थी अधिक जागरूक असल्याने ही टक्केवारी वाढली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील शाळांची टक्केवारी वाढली आहे. मात्र, सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण शहरातील शाळांमध्ये दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur vidarbh ssc result
First published on: 09-06-2015 at 06:56 IST